Akshay Kumar : अक्षय कुमार कोणत्या धर्माला मानतो? उत्तराची होतेय चर्चा
अभिनेता अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो कोणता धर्म पाळतो किंवा कोणत्या धर्मावर त्याचा विश्वास आहे, याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय सध्या त्याच्या आगामी 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.

'बॉलिवूडचा खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'वेलकम टू जंगल' या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. येत्या 26 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय धर्माविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

तू कोणता धर्म मानतोस किंवा पाळतोस, असा प्रश्न अक्षयला 'ब्रुट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, "माझा हिंदू धर्मावर विश्वास आहे. कारण माझ्या आई-वडिलांनी मला तेच शिकवलं आहे. मी हिंदू धर्माचं पालन करतो, परंतु मला तो कोणावर थोपवायचा नाहीये."

"सर्वांची आपली वैयक्तिक निवड असते. त्यामुळे मला कोणावरही धर्म थोपवायचा नाही", असं तो पुढे म्हणाला. मात्र याआधी 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी अक्षयने धर्माबद्दल वेगळंच उत्तर दिलं होतं. "मी कोणत्याच धर्माला मानत नाही, कारण माझ्या मते एकच धर्म आहे, तो म्हणजे भारतीय", असं त्याने 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

देवांवर अक्षयचा खूप विश्वास आहे आणि अनेकदा त्याने धार्मिक स्थळांनाही भेट दिली आहे. पण त्याचबरोबर त्याला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे. म्हणूनच भारतीय असण्यालाच तो त्याचा पहिला धर्म मानतो. अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्गा आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरांसह अनेक धार्मिक स्थळांच्या नूतनीकरण किंवा जीर्णोद्धारासाठी देणगी दिली आहे.

अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 26 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला भाग 2007 मध्ये आणि दुसरा भाग 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, परेश रावल, सुनील शेट्टी, राजपाल यादव, फरिदा जलाल आणि जॅकी श्रॉफ अशी मोठी स्टारकास्ट आहे.