
आजकाल ऑनलाइन पेमेंटचा जमाना आहे. शॉपिंग मॉलमध्ये असो किंवा रस्त्यावरील भाजी-फळ विक्रेता, सगळीकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते.या कोडने ऑनलाइन पेमेंट पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी QR खूप सोयीस्कर ठरतो. फक्त एक QR कोड स्कॅन करुन तुम्ही क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकता.

पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की या QR कोडचा शोध पहिल्यांदा कोणी लावला? ही कल्पना कोणाला सुचली ? हा QR कोड इतकी माहिती कशी साठवतो आणि त्याचे पेटंट अद्याप का घेतले गेले नाही? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील ना, चला मग जाणून घेऊया माहिती.

जपानमधील टोयोटाची उपकंपनी असलेल्या डेन्सो वेव्हमध्ये काम करणारा इंजिनिअर मासाहिरो हारा यांनी क्यूआर कोडचा शोध लावला होता. लोकप्रिय जपानी गेम GO मधून त्यांना ही कल्पना सुचली. गेममधील पांढऱ्या चेंडूंकडे पाहिल्यावर त्यांना क्यूआर कोडचे पॅटर्न दिसू लागले.

पूर्वी, बारकोड वापरले जात होते, ज्याचा शोध 1949 साली लागला होता. मात्र, त्याची अशी मर्यादा होती की त्यांच्याकडे फक्त उभ्या रेषा होत्या, त्यामुळे ते खूप कमी माहिती साठवू शकायचे.

त्यानंतर मासाहिरो हारा यांनी एक नवीन 2D कोड विकसित करण्याचा निर्णय घेतला, जो आडव्या आणि उभ्या दोन्ही रेषांमध्ये माहिती साठवेल. यात बारकोडपेक्षा जास्त माहिती असेल. म्हणूनच त्यांनी याला चौरस आकार देत, उजवीकडून डावीकडे आणि वरपासून खालपर्यंत धावणाऱ्या रेषा त्यामध्ये वापरल्या.

हा QR (क्विक रिस्पॉन्स) कोड स्कॅन केल्यानंतर लगेच वाचता येतो आणि पेमेंट प्रक्रिया केली जाते. या QR कोडमध्ये हजारो अक्षरं साठवण्याची क्षमता आहे, ज्यामुळे तो अतिशय खास ठरतो.

पण एक काळ असा होता, जेव्हा लोकांना असं वाटत होतं की क्यूआर कोडचं युग संपलं आहे. मात्र असं असलं तरी चीनमध्ये स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे क्यूआर कोड पुन्हा जिवंत झाले आणि ते सर्वत्र पुन्हा वापरण्यास सुरुवात झाली.

शिवाय, QR कोडचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे कधीही पेटंट घेतलं गेलं नाही. याचं कारण असं की ते जास्तीत जास्त लोकांनी वापरावं अशी त्याच्या शोधकर्त्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी त्याचे पेटंट घेतलं नाही.