वायफाय राऊटर नक्की कधी आणि किती वेळा रीस्टार्ट करावा?
तुमच्या घरातील वाय-फाय राउटर २४ तास चालू असतो का? यामुळे इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो. राउटर कधी, कसा आणि किती वेळा रीस्टार्ट करावा आणि त्याचे फायदे काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

आपल्या घरात अशी अनेक उपकरणं असतात जी एकदा सुरू झाली की अनेक दिवस किंवा महिने चालूच असतात. यात वाय-फाय राउटर (Wi-Fi Router) चाही समावेश होतो. अनेकदा आपल्या घरातील वायफाय राऊटर आपण २४ तास चालूच ठेवतो.

पण तुम्हाला माहीत आहे का? या सवयीमुळेच तुमच्या इंटरनेटचा स्पीड अचानक कमी होतो किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या निर्माण होतात. अशा वेळी फक्त राऊटर रीस्टार्ट केल्याने इंटरनेटच्या बहुतांश समस्या एका झटक्यात सुटू शकतात. पण राउटर नक्की कधी, कसा आणि किती वेळा रीस्टार्ट करावा? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

राउटर सतत चालू राहिल्याने त्यामध्ये कॅशे मेमरी (Cache Memory) आणि जंक डेटा साठत राहतो. रीस्टार्ट केल्याने हा डेटा पूर्णपणे साफ होतो आणि राउटरची कार्यक्षमता वाढते. तसेच बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या अनावश्यक प्रोसेस बंद झाल्यामुळे इंटरनेटचा वेग आणि नेटवर्कमधील अडथळे दूर होतात.

जर तुमचे मोबाईल किंवा लॅपटॉप वाय-फायवरून वारंवार डिस्कनेक्ट होत असतील, तर रीस्टार्ट केल्याने कनेक्शन एकदम स्थिर होते. राउटर पुन्हा सुरू केल्यावर त्याला एक नवीन आणि फ्रेश आयपी ॲड्रेस (IP Address) मिळतो. यामुळे इंटरनेटचा स्पीड तर वाढतोच, शिवाय सुरक्षितताही सुधारते.

राऊटर सतत चालू राहिल्याने तो गरम होतो. काही वेळ तो बंद ठेवल्यास अतिउष्णतेमुळे होणारे नुकसान टाळता येते. राउटर हा एका छोट्या कॉम्प्युटरसारखाच असतो, ज्याला स्वतःची मेमरी आणि ऑपरेटिंग सिस्टम असते.

त्यामुळे लोड कमी करण्यासाठी महिन्यातून किमान एकदा होम राउटर रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. यामुळे राउटरला एक नवीन सुरुवात मिळते. तसेच इंटरनेटचा वेग कायम राहतो.