
मानवी शरीराचा ७० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे, हे आपल्याला लहानपणी शाळेत शिकवले जाते. पण तरीही आपण कुठेही धडपडलो, कापलं किंवा एखादी साधी जखम झाली तरी आपल्या शरीरातून पाणी न येता रक्त बाहेर येते.

आपल्या शरीरामध्ये ७० टक्के पाणी असूनही जखम झाल्यास रक्त का निघते? असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत. मानवी शरीराच्या जटिल रचनेत आणि पेशींच्या विशिष्ट कार्यामध्ये याचे उत्तर दडलेले आहे.

मानवी शरीरातील ७० टक्के पाणी हे मुक्त स्वरूपात (Free water) नसते. हे पाणी प्रामुख्याने आपल्या शरीरातील अब्जावधी पेशींच्या आत, पेशींच्या दरम्यान असलेल्या पोकळीत आणि रक्ताभिसरण संस्थेमध्ये साठवलेले असते.

त्यामुळे, जेव्हा आपल्याला जखम होते, तेव्हा आपण केवळ पाणी गमावत नाही, तर त्या भागातील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे रक्त बाहेर येते. रक्त हे स्वतः एक लिक्विड टिश्यू आहे. ज्यामध्ये प्लाझ्मा नावाचा पिवळसर द्रव आढळतो.

त्यात लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी व प्लेटलेट्स तरंगत असतात. या प्लाझ्मामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते. म्हणजेच, जखमेतून जे रक्त बाहेर येते, त्यातही मोठ्या प्रमाणात पाणीच असते. परंतु हेमोग्लोबीनमुळे त्याला लाल रंग प्राप्त झालेला असतो.

थोडक्यात सांगायचे तर, मानवी शरीर पाण्याने बनलेले असले तरी ते पाणी वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागलेले आहे. जखम झाल्यावर ज्या वाहिन्या कापल्या जातात, फक्त त्यात मिसळलेल्या पेशी आणि प्रथिनांमुळे त्याला वेगळी ओळख मिळते.

त्यामुळे शरीरात ७० टक्के पाणी असूनही रक्त बाहेर येणे ही शरीराची एक संरक्षक यंत्रणा आहे, जी आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच जखम भरून काढण्यासाठी आवश्यक ऊर्जा आणि ऑक्सिजन पुरवण्याचे काम अविरतपणे करत असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)