
तुम्ही कितीही महाग स्मार्टफोन घेतला तरी त्याला विश्रांतीची गरज असते. ज्याप्रमाणे आपल्याला कामातून ब्रेक हवा असतो, त्याप्रमाणे तुमच्या फोनलाही आठवड्यातून किमान एक ब्रेक म्हणजे रिस्टार्ट करण्याची गरज असते.

पण स्मार्टफोन काही तासांसाठी बंद करून तो रिस्टार्ट केल्याने नेमकं काय होतं, याबद्दल अनेकांना माहिती नसते. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच याचे फायदे नेमके काय असतात, याचीही माहिती आपण घेणार आहोत.

स्मार्टफोन रिस्टार्ट करण्याचे अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत. ज्यामुळे तुमच्या फोनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा फोन काही तासांसाठी बंद करून तो रीस्टार्ट केल्यास तो RAM (Random Access Memory) साफ करतो.

तुम्ही एखादे ॲप बंद केले असले तरी ते अनेकदा बॅकग्राउंडमध्ये चालू राहते. बॅकग्राउंड ॲप्स RAM मध्ये जागा अडवतात, ज्यामुळे फोन स्लो चालतो. फोन रीस्टार्ट केल्याने RAM मध्ये बॅकग्राउंडमध्ये चालू असलेल्या या सर्व अनावश्यक गोष्टी बंद होतात. ज्यामुळे तुमच्या फोनचा वेग आणि कार्यक्षमता वाढते.

जर तुम्हाला वाय-फाय, ब्लूटूथ किंवा सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येत असतील तर फोन रीस्टार्ट केल्याने बऱ्याचदा ही समस्या चुटकीसरशी सुटते.

जर तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट असूनही इंटरनेट चालत नाही किंवा दुसऱ्या फोनच्या हॉटस्पॉटशी कनेक्ट होत असूनही अडचण येत असेल तर अशावेळी फोन रीस्टार्ट केल्याने कनेक्टिव्हिटीशी संबंधित तात्पुरत्या त्रुटी दूर होतात. त्यानंतर तुमचा फोन पुन्हा सहजपणे कनेक्ट होऊ लागतो.

जर तुमचा फोन वारंवार हँग होत असेल किंवा त्याला रिस्पॉन्स देण्यास वेळ लागत असेल तर तो रीस्टार्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा सॉफ्टवेअरमधील तात्पुरत्या स्वरुपात होणाऱ्या गडबडीमुळे फोन हँग होतो आणि तो रिस्टार्ट केल्याने ही समस्या दूर होते.

साधारणपणे आठवड्यातून किमान २ वेळा फोन रिस्टार्ट करावा. दोन वेळा शक्य नसेल तर आठवड्यातून किमान एकदा तरी फोन रिस्टार्ट करणं गरजेचे आहे. काही कंपन्या त्यांचे फोन दररोज रीस्टार्ट करण्याची शिफारस करतात.

तुम्ही शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी तुमचा फोन काही मिनिटांसाठी बंद करून पुन्हा चालू करा. या सवयीमुळे तुमच्या फोनचे आयुष्य वाढेल. तसेच कार्यक्षमता उत्तम राहील.

फोन रीस्टार्ट करणे म्हणजे तुमचा फोन बंद करून पुन्हा चालू करणे आणि फॅक्टरी रिसेट करणे या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. फॅक्टरी रिसेट केल्याने तुमचा सर्व डेटा आणि सेटिंग्ज डिलिट होतात.