
आज जागतिक मलेरिया दिवस आहे. मलेरियाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मलेरियाबाबत लोकांना माहिती दिली जाते आणि जनजागृती घडवली जाते.

मलेरिया हा रोग मादी अॅनोफिलीज डास चावल्याने होतो. तसेच मलेरिया झाल्यानंतर योग्य वेळी उपचार सुरू केल्यास रुग्ण दोन ते पाच दिवसांत बरा होऊ शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की डास हा इतका भयानक प्राणी आहे जो सापांपेक्षाही जास्त धोकादायक मानला जातो. तर आज आपण डासांशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

डासांच्या एक दोन नव्हे तर तब्बल तीन हजार प्रजाती आहेत. या प्रजाती इतर कोणत्याही जीवांपेक्षा जास्त रोग पसरवण्याचं काम करतात. तसेच मादी डास ही एका वेळी 300 अंडी घालते. तर नर डास हा 10 दिवस जगतो आणि मादी डास आठ आठवडे जगते. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, डासांचे सहा पाय असतात आणि त्यांच्या तोंडात 47 दात असतात. महत्त्वाचं म्हणजे ते 'O' रक्तगट असलेल्या लोकांना चावतात.

संशोधनानुसार, बिअर पिणाऱ्या लोकांना हा डास नक्कीच लक्ष्य करतो. हा डास चावल्यानंतर तो एकावेळी तुमच्या शरीरातून 0.001 ते 0.1 मिली रक्त शोषू शकतो. तसेच डासांची स्मरणशक्ती ही खूप तीक्ष्ण असते. जर तुम्ही डास मारण्याचा प्रयत्न केला तर तो डास पुढील 24 तास तुमच्या जवळही फिरकत नाही.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, माणसांना नर डास नाही तर मादी डास चावतात. कारण त्यांच्या अंड्याच्या विकासासाठी मादी डासांना प्रथिनांची गरज असते, जी त्यांना मानवी रक्तातून मिळते. त्यामुळे ते मादी डास माणसांना चावतात.