
जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज 'एमएससी इरिना' आज सकाळी केरळमधील तिरुअनंतपूरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरावर पोहोचले. हे जहाज मंगळवारपर्यंत याच ठिकाणी राहणार आहे. 24,346 टीईयू (20 फूट समतुल्य युनिट) क्षमतेवर आधारित हे जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज आहे.

या कंटेनर जहाजाचं आगमन या बंदरासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मे रोजी हे कंटेनर जहाज राष्ट्राला समर्पित केले होते. एमएससी इरिना 399.9 मीटर लांब आणि 61.3 मीटर रुंद आहे. म्हणजे फिफाने निर्धारीत केलेल्या मानकानुसार फुटबॉल मैदानाच्या लांबीच्या जवळजवळ चार पट आहे.

आशिया आणि युरोप दरम्यान मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहतुकीसाठी हे जहाज डिझाइन केले आहे. त्यामुळे व्यापार मार्ग आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

'एमएससी इरिना' मार्च 2023 मध्ये लाँच करण्यात आले आणि त्याच वर्षी एप्रिलमध्ये त्याचा पहिला प्रवास सुरू झाला.

दक्षिण आशियाई बंदराला हे जहाज पहिल्यांदाच भेट देत आहे. अल्ट्रा-लार्ज कंटेनर व्हेसल्स (ULCVs) हाताळण्याच्या विजयनगरमच्या क्षमतेचे प्रदर्शन हे जहाज करते. अदानी पोर्ट्स आणि SEZ लिमिटेड द्वारे विकसित आणि संचालित, बंदराने अलीकडेच MSC तुर्कीए आणि MSC मिशेल कॅपेलिनी यासारख्या इतर प्रतिष्ठित श्रेणीच्या जहाजांचे स्वागत केले आहे. त्यामुळे सागरी व्यापारातील एक प्रमुख केंद्र म्हणून त्याची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे.