
मुंबईतील बहुप्रतिक्षित बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाने रहिवाशांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्या, लहान खोल्यांच्या जागी आधुनिक सुविधांनी युक्त प्रशस्त घरे मिळणार आहेत.

वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाने दोन पुनर्वसित इमारती उभारल्या आहेत. या इमारतींमधील ५५६ रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

गुरुवारी सकाळी ११ वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. वरळी आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळी त्यांच्या मतदारसंघात येतात. त्यांनी या प्रकल्पाची नियमित पाहणी केली होती. गणेशोत्सवापूर्वी रहिवाशांना घरांचा ताबा मिळावा, यासाठी पाठपुरावा केला होता.

आता आपण वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती समोर आली आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला होता. या प्रकल्पात एकूण १२१ चाळींचा पुनर्विकास होणार आहे.

वरळीतीन नवीन बीडीडी चाळीतील ९,६८९ सदनिका बांधल्या जाणार आहेत. यातील ९,३९४ निवासी आणि २९५ अनिवासी सदनिका बांधल्या जाणार आहेत. पिढ्यानपिढ्या १६० चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना आता ५०० चौरस फुटांची घरे मिळणार आहे.

यात अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा असणार आहेत. ही सदनिका विनामूल्य मिळणार आहे. या प्रकल्पात तळमजला ४० मजल्यांच्या एकूण ३३ इमारती बांधल्या जाणार आहेत. यातील प्रत्येक घरात ८०० बाय ८०० मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स, तसेच खिडक्यांसाठी पावडर कोटिंगच्या ॲल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे.

यातील प्रत्येक इमारतीचे बांधकाम भूकंपरोधक पद्धतीने करण्यात आले आहे. यात ३ पॅसेंजर लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट आणि १ फायर लिफ्टची सुविधा देण्यात आली आहे. त्यासोबतच या पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय देखील असणार आहे.

या प्रत्येक इमारतीत तळमजला+ ६ मजली पोडियम पार्किंग आणि २ प्रशस्त जिने असणार आहेत. यात रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना अशा सुविधांसाठी स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे.

या प्रकल्पामुळे जुन्या बीडीडी चाळींचा कायापालट होऊन रहिवाशांना सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैली जगण्याची संधी मिळणार आहे. आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच नवीन घरांची पाहणी केली होती.

यात त्यांनी काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ४० मजल्यांचे टॉवर आणि मुंबईच्या समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे इमारतींच्या नेमप्लेटवर सर्व नावे मराठीमध्ये लिहिलेली पाहायला मिळत आहेत.

दरम्यान म्हाडा मुंबई मंडळाच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील इमारत क्र. १ मधील डी आणि ई विंगमधील रहिवाशांना आज घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.