मोठी बातमी : जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप, सत्ताधारी भाजपचे तब्बल 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

| Updated on: Mar 15, 2021 | 8:01 AM

सत्ताधारी भाजपचे 57 पैकी 27 हून अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा सुरु आहे. भाजपमधील काही सूत्रांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

मोठी बातमी : जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप, सत्ताधारी भाजपचे तब्बल 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?
एकनाथ खडसे, गिरीश महाजन
Follow us on

जळगाव : महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला 4 दिवस शिल्लक असतानाच जळगावात राजकीय भूकंपाचं चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजपचे 57 पैकी 27 हून अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा सुरु आहे. भाजपमधील काही सूत्रांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप जारी करण्यापूर्वीच हे नगरसेवक सहलीवर गेले आहेत. दरम्यान, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला आहे. तसंच महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचं नावही निश्चित केलं आहे.(27 BJP corporators not reachable on the eve of Jalgaon Municipal Corporation Mayor elections)

जळगाव महापालिकेत भाजपचं स्पष्ट बहूमत आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. तर 18 मार्च रोजी नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर रवाना झाल्यामुळे महापालिकेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शिवसेनेकडून महापालिकेवर भगवा फडकवला जाण्याची शक्यता शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

पालकमंत्र्यांचा फार्महाऊसवरुन सुत्रे हलली?

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी केवळ 4 दिवस शिल्लक असतानाच शिवसेनेनं सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. रविवारी दुपारी 2 वाजेपासून भाजपचे 27 नगरसेवक नॉट रिचेबल होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाऊसवर एकत्र जमल्याची माहिती सुत्रांनी दिली. या ठिकाणाहूनच सेनेची सर्व सूत्रं हलली असल्याचंही सांगण्यात येत आहे. तसंच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे.

भाजपमध्ये धुसफूस

महापालिकेत भाजपचं बहुमत असलं तरी पक्षांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं ते भाजपविरोधात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीतच आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. पण महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना नगरसेवकांनी मध्यंतरी खडसे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपचे नगरसेवक नॉट रिचेबल होण्यामागे खडसे यांचाही हात असल्याची चर्चा सध्या जळगावात सुरु आहे.

इतर बातम्या :

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”, सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा

सांगलीतला राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ पुण्यात फेल! स्थायी आणि शिक्षण समितीवर भाजपचाच अध्यक्ष

27 BJP corporators not reachable on the eve of Jalgaon Municipal Corporation Mayor elections