रेवती सुळेंच्या रिसेप्शनमध्ये त्या तरुणाची चर्चा, PM मोदीही ऐकत होते शब्द अन् शब्द, तो आहे तरी कोण?

खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्नाचे रिसेप्शन नुकताच दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका तरुणाचा शब्द अन् शब्द ऐकताना दिसत आहेत. हा तरुण आहे तरी कोण?

रेवती सुळेंच्या रिसेप्शनमध्ये त्या तरुणाची चर्चा, PM मोदीही ऐकत होते शब्द अन् शब्द, तो आहे तरी कोण?
PM Modi
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 10:36 AM

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते. सध्या राज्यात या रिसेप्शनची चर्चा रंगली आहे. या रिसेप्शनला केंद्रीय गृहमंत्री आमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजेरी लावली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गप्पा मारणाऱ्या एका तरुणाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या व्यक्तीचा शब्द आणि शब्द ऐकत होते. आता ही व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया सविस्तर…

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी शरद पवारांच्या बाजूला बसून गप्पा मारताना दिसले. मात्र त्यांच्या जवळच निळ्या शर्टवर काळे जॅकेट घातलेला एक तरुण उभा राहून मोदींशी बोलत होता. तो मध्येच पंतप्रधानांना मोबाईल दाखवत होता, तर कधी कागदपत्रे. अनेकांना तो शरद पवारांचा नातेवाईक वाटला, पण प्रत्यक्षात तो पूर्णपणे वेगळी व्यक्ती आहे.

तो तरुण कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या तरुणाचे सर्व बोलणे लक्ष देऊन ऐकत आहेत त्याचे नाव मिथिलेश देसाई आहे. मिथिलेश हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील झापडे गावचे रहिवासी आहेत. ते शेतकरी आणि उद्योजक असून त्यांना ‘फणस किंग’ किंवा ‘जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी राहुरी येथून अभियांत्रिकीत बी.टेक. पदवी घेतली आहे. त्यानंतर ते दिल्लीत यूपीएससीची तयार करत होते. 2016मध्ये ते परिक्षा पास करुन मुलाखतीपर्यंत पोहोचले. पण त्यांची अंतिम निवड झाली नाही. त्यानंतर ते शेतीकडे वळले. त्यांनी यूपीएससीची तयारी सोडून वडिलांसोबत फणस (जॅकफ्रूट) शेतीवर लक्ष केंद्रित केले.

मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई हे शेतकरी आहेत. त्यांनी सन २००० च्या सुमारास केरळहून फणसाच्या विविध जाती आणून लागवड सुरू केली होती. मिथिलेश यांनी त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन आणि मूल्यवर्धन जोडले. त्यांच्या जवळपास २८ एकर शेतात जगभरातील ७० ते ८६ हून अधिक जातींचे फणस लावले आहेत. यामध्ये लाल, भगवा, पिवळा, वर्षातून दोनदा फळ देणारे आणि कुंडीत वाढणारे अशा प्रजातींचा समावेश आहे. जागतिक पातळीवरील सुमारे १२८ जातींपैकी अनेक गोळा करून त्यांनी संशोधन केले आहे. २०२०मध्ये त्यांनी ‘जॅकफ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड’ उभी केली. या कंपनीत वेगन मीट, बर्गर पॅटी, चिप्स, डायबेटिस व्यवस्थापनासाठी पावडर आणि जनावरांसाठी चारा अशी उत्पादने तयार केली जातात.

पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत मिथिलेश फणसासोबत करत असलेले प्रयोग आणि इतर उद्योगांबद्दल माहिती देत होते, असे सांगितले जाते. मोदीही त्यांचे म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us