‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप

| Updated on: Jan 12, 2020 | 9:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजचे शिवाजी महाराज आहेत, अशी तुलना या पुस्तकात करण्यात आल्याची माहिती आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' अशा आशयाचं पुस्तक लिहिलं आहे.

आज के शिवाजी नरेंद्र मोदी, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेलं ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले (Aaj Ke Shivaji Narendra Modi Book). भाजप दिल्ली प्रदेश कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते (Aaj Ke Shivaji Narendra Modi Book).

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजचे शिवाजी महाराज आहेत, अशी तुलना या पुस्तकात करण्यात आल्याची माहिती आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ अशा आशयाचं पुस्तक लिहिलं आहे. जय भगवान गोयल यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करत या पुस्तकाची माहिती दिली. भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकामुळे आता नवा वाद उद्भवला आहे.

शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या पुस्तकावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. “आज के शिवाजी नरेंद्र मोदी.. असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!!”, असं ट्वीट करत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला. “जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, हे मनाला पटत नाही”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

“हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही”, असं ट्वीट करत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर घणाघात केला.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या नावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महारांसोबत केल्याचं दिसून येतं. त्यामुळे या पुस्तकावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.