लिहून घ्या, मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा!

| Updated on: Feb 06, 2023 | 3:19 PM

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरु झाला. आजपासून या यात्रेत नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्हयांमध्ये त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

लिहून घ्या, मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा!
Image Credit source: social media
Follow us on

नाशिकः महाराष्ट्रातलं सरकार (Maharashtra Govt) कधीही कोसळणार आहे. राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) कधी होणारच नाही. आणि झाला तर नाराज आमदारांमुळे सरकार कधीही पडू शकतं, असं वक्तव्य युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलंय. आदित्य ठाकरे हे आज नाशिकमध्ये आहेत. शिवसंवाद यात्रेच्या पुढच्या टप्प्याला त्यांनी नाशिकमधून प्रारंभ केलाय. इगतपुरी येथे आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यामागे काही तांत्रिक अडचण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला संधी मिळेल, यासाठी अनेक आमदार आशा लावून बसले आहेत. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण आलंय.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

इगतपुरी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही आत्ता लिहून घ्या. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. आमदारांना नुसती गाजरं देऊन ठेवलेली आहेत. तुम्ही या मंत्री बनवतो.. पण एकही मंत्री बनणार नाही. सध्याच्या मंत्रिमंडळात कुणी तरुण नाही. शेतकऱ्यांचा आवाज, महिलांचा आवाज ऐकणारा नाही. हे सरकार नेमकं कुणाचं आहे? दिल्लीश्वरांचं की महाराष्ट्राचं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय.

राक्षसी महत्त्वाकांक्षा..

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गद्दारांनी सरकार पाडल्यावनंतर मी संवाद यात्रा सुरु केली आहे. राज्यातील स्थिती सर्वांना माहिती आहे. हे सरकार किती दिवस टिकणार, याचीही कल्पना आहे. पण एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी सगळ्यांना रोखून धरण्यात आलंय, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली.

‘हे ओके आहेत… जनता ओके नाही’

राज्यातील जनता आणि शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकला जात नाहीये. जनतेचाही आवाज ऐकू येत नाहीये. गावापर्यंत एकच घोषणा पोहोचली आहे, पन्नास खोके एकदम ओके… त्यामुळे हे लोक ओके आहेत, पण जनता ओके नाही. ग्रामीण भागात रस्तेही नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

स्वतःसाठी दिल्लीला जातात…

राज्य सरकारमधील मंत्री जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी दिल्लीत जातात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. पण या सरकारमधले लोक स्वतःसाठी दिल्ली आणि गुवाहटीला जातात, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

गद्दार गेले,शिवसैनिक उरले

गुवाहटीला गेलेले गद्दार होते. आता शिवसेनेत फक्त शिवसैसनिक उरले आहेत. इथे गटतट नाहीत. उद्धव साहेब आणि माझा असा कोणताही एक जिल्हा नाही. संपूर्ण महाराष्ट्र आमचा आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय.

आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेवर

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरु झाला. आजपासून या यात्रेत नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्हयांमध्ये त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. उद्या ७ फेब्रुवारी रोजी ते नाशिकमधून औरंगाबादच्या वैजापूर येथे येतील. वैजापुरातील नागरिक आणि शिवसैनिकांशी ते उद्या संवाद साधतील.