नगरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणेंचा राजीनामा

| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

अहमदनगर : काँग्रसेमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिला आहे. ससाणे गटाने शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी लोकसभा प्रचारासाठी मुंबईऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाला प्राधान्य दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या राजीनाम्याने काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना […]

नगरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणेंचा राजीनामा
Follow us on

अहमदनगर : काँग्रसेमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिला आहे. ससाणे गटाने शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी लोकसभा प्रचारासाठी मुंबईऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाला प्राधान्य दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या राजीनाम्याने काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. शिर्डी मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होईल.

अहमदनगरचे काँग्रेस अध्यक्ष करण ससाणे यांच्या समर्थकांचा बुधवारीच मेळावा घेण्यात आला होता. त्यात कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शिर्डीतील उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली. या बंडखोरीने थोरातांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी थोरातांनीच ससाणे यांना जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली होती.

‘राहुल गांधींचे विखेंऐवजी थोरातांना ताकद देण्याचे संकेत’

दरम्यान, राहुल गांधींची उद्या (शुक्रवारी) शिर्डी मतदारसंघातील संगमनेर येथे जाहीर सभा होणार आहे. राहुल गांधींनी सभेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणीऐवजी त्यांचे अंतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरला प्राधान्य दिले. त्यामुळे गांधींनी भविष्यात विखेंऐवजी थोरातांना ताकद देण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे सभेला हजर राहणार की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाऊसाहेब कांबळे यांना तर भाजप-शिवसेना युतीने सदाशिव लोखंडे यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे. शिर्डीचे माजी खासदार आणि भाजपचे नेते भाऊसाहेब वाकचौरे हे देखील बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढत आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांच्या बैठकांचे सत्र सुरु

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरु केले आहे. त्यांनी प्रत्येक गावात समर्थकांशी संवाद करत शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोणाला मदत करायची याची रणनिती आखायला सुरुवात केली. आज ते शिर्डीत आपल्या समर्थकांची बैठक घेत आहे. यात नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

‘दिवसा इकडे आणि सायंकाळी तिकडे असे करु नका’

राधाकृष्ण विखेंचे सुपुत्र सुजय विखे हेही युतीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ली संगमनेरमध्ये तळ ठोकून आहेत. युतीसाठी मनापासून काम करा. दिवसा इकडे आणि सायंकाळी तिकडे असे करु नका. युतीसाठी मनाने काम केले, तर पुढील 5 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करु, असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला. ते संगमनेरमध्ये युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.