काँग्रेस सोडा, अजय माकन यांचा मिलिंद देवरांना निर्वाणीचा इशारा

| Updated on: Feb 17, 2020 | 10:39 AM

तुला काँग्रेस सोडायची असेल, तर खुशाल जा. नंतर अर्धवट तथ्य असलेल्या माहितीचा प्रचार कर! असं ट्वीट अजय माकन यांनी मिलिंद देवरांना उद्देशून केलं.

काँग्रेस सोडा, अजय माकन यांचा मिलिंद देवरांना निर्वाणीचा इशारा
Follow us on

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी मिळवलेल्या सलग तिसर्‍या विजयाबद्दल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. मात्र काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री केजरीवालांचं गुणगान गायल्याने ज्येष्ठ नेते अजय माकन चांगलेच संतापले. माकन यांनी मिलिंद देवरांना पक्ष सोडण्याचा इशारा (Ajay Maken slams Milind Deora) दिला आहे.

मिलिंद देवरा यांनी रविवारी रात्री ट्विटरवर अरविंद केजरीवालांचा एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये केजरीवाल ‘आप’ सरकारच्या कार्यकर्तृत्वाचा पाढा वाचताना दिसत आहेत. दिल्लीला गेल्या पाच वर्षात आपला महसूल दुप्पट करण्यात यश मिळालं आहे. दिल्लीचं उत्पन्न आता 60 हजार कोटी रुपयांवर पोहचलं आहे, असं देवरांनी लिहिलं आहे.

मिलिंद देवरा यांच्या ट्वीटला तीन हजारापेक्षा जास्त रीट्वीट आणि 14 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनीही हा व्हिडीओ रिट्वीट केला. नि:शुल्क वीज, पाणी आणि बस सेवेसारख्या कल्याणकारी उपायांमुळे ‘आप’ने निवडणूक जिंकल्याची टीका होत असताना प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्याने केलेलं कौतुक केजरीवालांसाठी महत्त्वाचं आहे.

प्रतिस्पर्धी पक्षाबद्दल देवरा यांनी मनमोकळेपणाने केलेले कौतुक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांना रुचलेले नाही. ‘अर्धवट तथ्य’ असलेल्या गोष्टी सांगू नका किंवा काँग्रेस पक्षा सोडा, असा इशारा माकन यांनी दिला.

‘भावा, तुला काँग्रेस सोडायची असेल, तर खुशाल जा. नंतर अर्धवट तथ्य असलेल्या माहितीचा प्रचार कर! मला फारशी माहित नसलेली गोष्ट सांगू दे’ असं म्हणत माकन यांनी आकडेवारी जारी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली होती.

Ajay Maken slams Milind Deora