एकाच दिवशी वाढदिवस, एकाच दिवशी शपथ, एकाच दिवशी राजीनामा

| Updated on: Nov 26, 2019 | 4:27 PM

एकाच दिवशी वाढदिवस असलेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी एकाच दिवशी शपथ घेतली, तर एकाच दिवशी राजीनामाही दिला.

एकाच दिवशी वाढदिवस, एकाच दिवशी शपथ, एकाच दिवशी राजीनामा
Follow us on

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार ‘औट घटकेचं’ ठरलं. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकत्र शपथ घेतलेल्या फडणवीस-पवारांच्या बाबतीत एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला. एकाच दिवशी वाढदिवस असलेल्या दोघांनी एकाच दिवशी शपथ घेतली, तर एकाच दिवशी राजीनामाही (Ajit Pawar Devendra Fadnavis Resignation) दिला.

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला, तर अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 या दिवशीचा. दोघांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी शपथ घेतली होती, तर 26 नोव्हेंबर 2019 रोजी दोघांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा देण्याची नामुष्की आली आहे. याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे फडणवीस यांना देखील राजीनामा द्यावा लागेल असा अंदाज वर्तवला जात होता. तो खरा ठरत फडणवीसांनी बहुमत चाचणीत पराभव टाळण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावापूर्वी नामुष्की

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मॅरेथॉन भेटी घेत, अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीतच ठेवण्यात यश मिळवलं. सर्व दिग्गजांनी भेटी घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांची भेट अजित पवारांसाठी निर्णायक ठरली. सदानंद सुळे यांनी आज सकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवारांची भेट घेऊन, त्यांचं मन वळवल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी 3 दिवसात पदभार न स्वीकारताच राजीनामा दिला.

सदानंद सुळेंच्या भेटीनंतर अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का तर राष्ट्रवादीसाठी तितकाच मोठा दिलासा आहे.

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनिल तटकरे यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर रविवारी (24 नोव्हेंबर) जयंत पाटील दोनदा अजित पवार यांच्या घरी जाऊन भेटून आले. तर छगन भुजबळ यांनीही सोमवारी (25 नोव्हेंबर) अजित पवारांची मनधरणी केली.

सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अन्य सदस्यांनी देखील व्यक्तिगतपणे संपर्क करुन त्यांना परतण्याचे आवाहन केले. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून लाडक्या दादाला साद घातली होती. तर पुतणे रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना परतण्याची विनंती केली होती.

Ajit Pawar Devendra Fadnavis Resignation