
बारामती: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत दिली पाहिजे. राज्य सरकारने ताबडतोब अधिवेशन बोलावलं पाहिजे. पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यात होतं. पण जुलै झाला. ऑगस्ट आला. तरीही यांना मुहूर्त मिळेना. मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुठला ग्रीन सिग्नल मिळेना की त्यांच्यात एक वाक्यता होईना? मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) करायला कशाला घाबरत आहेत हे कळायला मार्ग नाही?, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना का भेटलो याची कारणेही मीडियाला सांगितली.
राज्यातील 13 कोटी जनता फार आशेने पाहत आहे. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. त्या त्या खात्याचे मंत्रीच हे प्रश्न सोडवू शकतात. सचिव म्हणतात, मंत्र्यांचा रिमार्क असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर परिस्थिती टाकली. पण ते लक्ष देत नाहीत. म्हणून राज्यपालांना भेटलो. आता जनतेनीच पाहावं कसा कारभार चाललाय आणि कोण त्याला जबाबदार आहे, असं अजित पवार म्हणाले.
कुणी सरकारमध्ये आलं तरी काम करत असताना कायदा नियम आणि संविधानाच्या अधीन राहून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. या विचाराचा मी आहे. मी दुष्काळी दौऱ्यासाठी राज्यपालांना अजिबात भेटलो नाही. मी पूरग्रस्त भागाचा दौरा करून भेटलो होतो. आता महाराष्ट्रात दुष्काळ नाही. काहीही प्रश्न विचारू नका. प्रश्नांची माहिती घ्या, अशा शब्दात त्यांनी पत्रकारांनाही फटकारलं.
आम्ही दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. पूरग्रस्त भागाचं नुकसान, गोगलगायीचा प्रादूर्भाव, पिकं उद्ध्वस्त झाली, लोकं आत्महत्येचं पाऊल उचलत आहेत. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे तातडीने पावले उचलावीत आणि त्यांना तातडीने मदत करावी. मनुष्यहानी झाली. पाळीव प्राण्यांची हानी, रस्ते खचले, शेती, घर सर्वांचं नुकसान झालं. पूल तुटले आहेत. पंधरा तीन आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे लोकांना मदत दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.