सातारा नगर पालिका निवडणूक : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Feb 07, 2022 | 4:32 PM

साताऱ्यात चर्चेत असणारे कारण म्हणजे सातारा एमआयडीसी (Satara MIDC) परिसरात शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेली पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा. या प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांनी हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.

सातारा नगर पालिका निवडणूक : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप, नेमकं प्रकरण काय?
शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले
Follow us on

सातारा : नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता साताऱ्यात चर्चेत असणारे कारण म्हणजे सातारा एमआयडीसी (Satara MIDC) परिसरात शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेली पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा. या प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांनी हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील 80 कामगारांना 1 फेब्रुवारीपासून कामावरून अचानक कमी करण्यात आलं आहे. त्यानंतर हे सर्व कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

शिवेंद्रराजेंनी 42 कोटीची मालमत्ता 8 कोटीत घेतली?

2016 पासून या कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे आणि या कंपनीचा विषय न्यायप्रविष्ठ आहे. तरी देखील या कंपनीची जागा आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केला केली असल्याचा आरोप करण्यात येतोय. याप्रकरणी कंपनीत काम करणारे कामगार आक्रमक झाले होते. त्यांनी कंपनीच्या गेटसमोरच सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ही कंपनीची जागा कवडीमोल भावाने बेकायदेशीररित्या खरेदी केली असल्याचा आरोप या कंपनीतील कामगारांनी केला आहे. कंपनीची 42 कोटी रुपयांची मालमत्ता असताना 8 कोटी रुपये या भावात ही कंपनी कवडीमोल भावाने विकत घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलिसांनी वेळेत या आंदोलनात हस्तक्षेप करत कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच खरेदी- शिवेंद्रराजे

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकांकडून ही जागा खरेदी केली नसल्याचं शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय. एनसीएलटी कोर्ट प्रक्रियेच्या लिलावात संबंधित कंपनीची जागा खरेदी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबाबतची सर्व कागदपत्र आपल्याकडे आहेत, असा दावाही शिवेंद्रराजे यांनी केलाय. कंपनीतील कर्मचाऱ्यांचा पगाराचा जो काही प्रलंबित प्रश्न आहे त्याच्याशी आपला काही संबंध नसल्याचंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय.

राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकले असते – उदनयराजे

सातारा एमआयडीसी मधील पंडित ऑटोमोटिव्ह ही कंपनी शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीररीत्या खरेदी केल्याचा आरोप कामगारांनी केला होता. या कामगारांच्या या लढ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. सातारा एमआयडीसीमध्ये चाललेल्या भोंगळ कारभारा बाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकले असते, अशा शब्दात उदयनराजे यांनी टीका केलीय.

उदनयराजेंच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर

दरम्यान, आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन, असा टोला शिवेंद्रराजे यांनी लगावलाय. सातारा एमआयडीसी संपायला उदयनराजेच जबाबदार आहेत. तसंच कारखानदारांकडून हप्ते घेणं, त्यांना दमटाटी करणं यामुळे साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत आणि असलेल्या कंपन्या निघून गेल्या, असा गंभीर आरोप शिवेंद्र राजे यांनी उदयनराजेंवर केलाय. मी ही कंपनीची जागा खरेदी करताना संपूर्ण कायदेशीरपणे खरेदी केली आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचंही शिवेंद्रराजे म्हणाले.

इतर बातम्या :

वाढदिवसाचं औचित्य, शिंदेंचा मुख्यमंत्री बनण्याचा इरादा पक्का? ठाण्यातील पोस्टर्सनी चर्चांना उधाण

कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार? – सदाभाऊ खोत