Chandrakant Patil : अशी विधाने खपवून घेणार नाही, अमित शाह यांची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना तंबी; चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानाची दखल

भाजपच नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान केलं आहे. पाटील यांनी या आंदोलनातील शिवसेनेचं योगदान नाकारलं आहे. त्यावरून अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Chandrakant Patil : अशी विधाने खपवून घेणार नाही, अमित शाह यांची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना तंबी; चंद्रकांतदादांच्या त्या विधानाची दखल
chandrakant patil
Image Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Apr 12, 2023 | 11:01 AM

नवी दिल्ली : भाजचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी आंदोलनातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं योगदान नाकारलं आहे. बाबरी आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता नव्हता. बाबरी पाडण्याचं सर्व श्रेय हे विश्व हिंदू परिषदेलाच जातं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर संताप व्यक्त केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा मागितला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते अमित शाह यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना वादग्रस्त विधान न करण्याचे आदेशच दिले आहेत.

भाजपचे आमदार आशिष शेलार काल दिल्लीत होते. शेलार यांनी काल अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील राजकीय समीकरणं, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती यावरही या नेत्यांसोबत शेलार यांनी चर्चा केली. त्यावेळी अमित शाह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विकासावरच बोला

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी विधाने खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातील नेत्यांनी वादग्रस्त विधाने करू नये. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. ते योग्य नाही. याला आवर घाला. केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत आहे. दोन्ही सरकारच्या विकासकामांवरच बोला, अशी ताकीदच शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीत बाबरी आंदोलनातील शिवसेनेचं योगदान नाकारलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं बाबरी आंदोलनात योगदान नाही. शिवसेनेचा नेता बाबरी पडताना तिथे नव्हता, असं सांगतानाच बाबरी आंदोलनाचं सर्व श्रेय हे विश्व हिंदू परिषदेलाच दिलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांचं हे विधान आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावर संताप व्यक्त केला होता. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा मागितला होता. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Follow Us