Sanjay Raut : शिवसेनेकडून संजय पवारांची उमेदवारी जाहीर, संजय राऊत संभाजीराजे छत्रपतींबद्दल काय म्हणाले?

| Updated on: May 24, 2022 | 4:52 PM

खासदार संजय राऊत यांनी संजय पवारांच्या नावाची घोषणा केलीय. त्यावेळी मावळे असतात म्हणून राजे असतात, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी एकप्रकारे संभाजीराजे छत्रपतींना टोला लगावलाय.

Sanjay Raut : शिवसेनेकडून संजय पवारांची उमेदवारी जाहीर, संजय राऊत संभाजीराजे छत्रपतींबद्दल काय म्हणाले?
संजय राऊत, संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राज्यसभा उमेदवारीवरुन जोरदार घडामोडी पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केलीय. त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्याकडून सहकार्याचं आवाहन केलं होतं. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली. शिवसेनेनं (Shivsena) संभाजीराजेंना पक्षप्रवेश करत शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्तावही दिला. मात्र, संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर आता शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी खासदार संजय राऊत यांनी संजय पवारांच्या नावाची घोषणा केलीय. त्यावेळी मावळे असतात म्हणून राजे असतात, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी एकप्रकारे संभाजीराजे छत्रपतींना टोला लगावलाय.

‘मावळे असतात म्हणून राजे असतात’

संजय राऊत म्हणाले की, संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतलाय अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. दोन्ही जागी शिवसेना उमेदवार विजयी होतील. संजय पवार हे अनेक वर्षे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख आहेत. कडवट शिवसैनिक आहेत, पक्का मावळा आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात. आम्ही सगळे जे आहोत, पक्षनेते, पक्षाचे इतर पदाधिकारी हे मावळ्यांच्या जिवावर उभे असतात.

‘आम्ही नक्कीच संभाजीराजेंचा आदर ठेवतोय’

संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, नोटीफिकेशन अजून आलं नाही. शिवसेनेच्या दृष्टीनं सहाव्या जागेचा चॅप्टर क्लोज, फाईल बंद झाली आमच्याकडून. आम्ही नक्कीच संभाजीराजेंचा सन्मान ठेवतोय. नक्कीच आम्ही तांचा, त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या गादीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आहे. त्यासाठीच आम्ही शिवसेनेचा उमेदवार होण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यांना अपक्ष लढायचं आहे. निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज आहे, जर कुणाकडे 42 मतं असतील तर तो राज्यसभेवर यावेळी निवडून येऊ शकतो. मला असं वाटतं की संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे मला माहिती नाही. पण आमच्याकडे प्रस्ताव आला तेव्हा आम्ही छत्रपतींच्या गादीचा, वंशजांचा सन्मान याचा विचार करुन शिवसेनेत प्रवेश करा. कारण आम्हाला शिवसेनेचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवायची आहे, असं सांगितल्याचंही संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘अनेक राजघरण्यातील लोक अनेक पक्षाकडून लोकसभा, राज्यसभेत’

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून परप्रांतिय प्रियंका चतुर्वेदीला शिवसेना उमेदवारी देते. मग संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा का नाही? असा सवाल करण्यात आलाय. त्याबाबत विचारलं असता, ‘आम्ही कुणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही. एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते. सामनाच्या उभारणीतही त्यांचा वाटा आहे. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्याच उमेदवार आहेत. प्रितिश नंदी हे देखील शिवसेनेचेच उमेदवार होते. ते पक्षाचे सदस्य आणि पक्षाचेच उमेदवार होते. वरिष्ठ शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शाहू महाराज हे सुद्धा पक्षाच्या तिकीटावर लोकसभा लढले आहेत. मालोजीराजे भोसले हे देखील पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले आहेत. स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादीच्या तिकीटावरुन कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजांना कुठल्या पक्षाचं वावडं नसावं. देशातही अनेक राजघराण्यातील लोक अनेक पक्षाच्या तिकीटावर लोकसभा आणि राज्यसभेवर आहेत’, असंही संजय राऊत म्हणाले.