Arjun Khotkar : अर्जुन खोतकर मित्रत्वाच्या गळाला लागले, आम्ही 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार; सुरेश नवले यांचं मोठं विधान

| Updated on: Jul 29, 2022 | 12:37 PM

Arjun Khotkar : खोतकर सकारात्मक आहेत. आमच्यासोबत यायचं की नाही याबाबत उद्या ते उत्तर देणार आहेत. उद्याची वाट पाहा, असं सूचक विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं. यावेळी त्यांनी लोकसभेतील गटनेतेपदावरून शिवसेनेवर टीका केली. यांना सगळंच बेकायदेशीर वाटतंय. गटनेत्याची निवड ही कायदेशीर आहे.

Arjun Khotkar : अर्जुन खोतकर मित्रत्वाच्या गळाला लागले, आम्ही 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार; सुरेश नवले यांचं मोठं विधान
अर्जुन खोतकर मित्रत्वाच्या गळाला लागले, आम्ही 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार; सुरेश नवले यांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: शिवसेनेचे मराठवाड्यातील बडे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे शिवसेनेला (shivsena) जय महाराष्ट्र करणार असल्याचं निश्चित झालं आहे. जालन्याला पोहोचल्यानंतर उद्या ते याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहेत. माझी भूमिका मी उद्या जालन्यात गेल्यावर जाहीर करणार आहे. तत्त्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. तर अर्जुन खोतकर आणि माजी मंत्री सुरेश नवले येत्या 31 जुलै रोजी सिल्लोडमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं माजी राज्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. तर सत्तार यांच्या या दाव्याला सुरेश नवले यांनी दुजोरा दिला. खोतकर मित्रत्वाच्या गळाला लागले आहेत. आम्ही 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार आहोत, असं नवले यांनी स्पष्ट केलं आहे.

माजी मंत्री अब्दुल सत्तार, सुरेश नवले आणि अर्जुन खोतकर हे तिघेही दिल्लीत आहे. सत्तार यांनी महाराष्ट्र सदनात जाऊन अर्जुन खोतकर यांची मनधरणी करत त्यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी तयार केलं आहे. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते. या चारही नेत्यांनी यावेळी ब्रेकफास्ट करत खोतकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर चर्चा केली.

हे सुद्धा वाचा

नवले काय म्हणाले?

या भेटीनंतर सुरेश नवले यांनी मीडियाशी संवाद साधला. मी 26 तारखेलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन केलं आहे. सत्तार यांच्या मतदारसंघात 31 तारखेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातच मी आणि खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. शिंदे हे सक्षम आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आहे. आम्ही खोतकर यांना मित्रत्वाची गळ घातली आहे. ते मित्रत्वाच्या गळाला लागले आहेत, असं नवले म्हणाले.

खोतकर सकारात्मक, उद्याची वाट पाहा

तर, खोतकर सकारात्मक आहेत. आमच्यासोबत यायचं की नाही याबाबत उद्या ते उत्तर देणार आहेत. उद्याची वाट पाहा, असं सूचक विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं. यावेळी त्यांनी लोकसभेतील गटनेतेपदावरून शिवसेनेवर टीका केली. यांना सगळंच बेकायदेशीर वाटतंय. गटनेत्याची निवड ही कायदेशीर आहे. 18 पैकी 12 खासदार म्हणतात हा गटनेता आहे. त्यांना गटनेता बदलण्याचा अधिकार आहे. या गटनेत्याला सभागृहाच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. बेकायदेशीर असं काही नाही, असं त्यांनी सांगितलं.