‘भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही’, खासदार अरविंद सावंतांचं भाजपला प्रतिआव्हान

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी ट्वीट करत भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना कधीच संपणार नाही, असं सावंत म्हणाले.

भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही, खासदार अरविंद सावंतांचं भाजपला प्रतिआव्हान
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 8:11 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावण्यात आलीय. पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून संजय राऊतांवर ही कारवाई करण्यात आलीय. त्यावरुन शिवसेनेच्या नेत्यांकडून कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातोय. तसंच भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. तसंच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या वक्तव्यावरुनही शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी ट्वीट करत भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना कधीच संपणार नाही, असं सावंत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत की भाजपला शिवसेना संपवायची आहे. हेच आज जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं. महामहिम राज्यपालांच्या कालच्या वक्तव्यामागे भाजपला आहे हे देखील समोर आलंय. जे गद्दार शिवसेना आमची असं म्हणतात त्यांचे काय होणार, हे ही आता महाराष्ट्राच्या लक्षात आलं. त्यांना आता भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, असा दावाही अरविंद सावंत यांनी केलाय.

‘भाजपसोबत लढणारा कोणताच राजकीय पक्ष आज शिल्लक नाही’

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपच राहणार, असं वक्तव्य भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर नड्डा यांचं हे वक्तव्य आल्यानं राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. अशावेळी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नड्डांना थेट उत्तर दिलंय. ‘भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष शिल्लक नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहेत. महाराष्ट्रात शिवसेना संपणार म्हणतात, पण हे त्यांनी करूनच पाहावं, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय.

‘दिवस सर्वदा सारखे नसतात, दिवस फिरतात’

संजय राऊतांच्या अटकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राऊतांबद्दल मला अभिमान आहे. ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत, ठीक आहे. राजकारण म्हटलं की त्याची बुद्धीबळाशी तुलना करतो. आजच्या राजकारणात बुद्धीचा नाही बळाचा वापर केला जात आहे. नुसते बळ तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असला तर दिवस सर्वदा सारखे नसतात, दिवस फिरतात. दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, असा इशाराच ठाकरे यांनी दिलाय.