संजय राऊतांची भूमिका राम मंदिर विरोधी, आशिष शेलारांचा हल्लाबोल

| Updated on: Dec 21, 2020 | 11:55 AM

कंत्राटदारांच्या मर्जीने BMC चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे? शेलारांचा सवाल

संजय राऊतांची भूमिका राम मंदिर विरोधी, आशिष शेलारांचा हल्लाबोल
Sanjay Raut Ashish Shelar
Follow us on

मुंबई : “आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा. शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी आहे, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?” असा बोचरा सवालही शेलारांनी विचारला. देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी राम मंदिर बांधले जात आहे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी भाजपला लगावला होता. (Ashish Shelar slams Sanjay Raut over Saamna Editorial on Ram Mandir)

“2024 च्या पराभवाची पायाभरणी जाहीररित्या का मांडता?”

“सामान्य माणसाने दिलेल्या वर्गणीतून राम मंदिर उभं राहणार असेल, तर त्यांना खुपतंय. आयुष्यभर ज्यांना महापालिकेतील कंत्राटदारांच्या जीवावर स्वतःचा पक्ष चालवण्याची सवय आहे, त्यांना राम भक्तांकडून जमा केलेल्या वर्गणीच्या आधारावर होणाऱ्या राम मंदिराच्या कामात डोळेखुपी होणारच. 2024 च्या पराभवाची पायाभरणी संजय राऊत जाहीररित्या का मांडत आहेत?” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.

“शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी”

“भाजपसाठी हा मुद्दा राजकीय नाही. संजय राऊत आणि शिवसेना या दोघांनाही राम मंदिराच्या कामात अडंग आणण्याची भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे, पायाभरणी कार्यक्रमही ई पद्धतीने घेण्याची मागणी होती, आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छेने येणाऱ्या निधीतून राम मंदिराचं काम होतंय. आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा, या पद्धतीची राम मंदिर विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, असं आमचं मत आहे.

“राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधू ते कारसेवक, किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत. या आंदोलनात ज्यांची केवळ राजकीय घुसखोरी होती, त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पूजनाची पोटदुखी झाली होती. त्यांनाच आता “रामवर्गणी” डोळ्यात खूपत आहे. राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?” असं ट्विटही आशिष शेलार यांनी केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराचं राजकारण केव्हातरी संपावं, आता हे वर्गणीचं काय प्रकरण काढलं आहे नवं, हे माहित नाही. चार लाख स्वयंसेवक गावोगावी जाऊन वर्गणी गोळा करणार आहेत. मला असं वाटतं, अयोध्येच्या राजाला, जी देशाची अस्मिता आहे… घरोघर जाऊन वर्गणी घेणं लोकांना पटत नाही.. ” अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

सामनाच्या अग्रलेखात काय?

“अयोध्येतील राम मंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरु होणार आहे. 14 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असे विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय यांनी सांगितले. आता या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतील. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे?” असे सवाल शिवसेनेने विचारले आहेत.

“मंदिर निर्माणाचा खर्च साधारण 300 कोटींच्या घरात आहे. मुख्यमंत्री योगी यांनी राम मंदिर बांधकामात निधीची चिंता करु नये, असे बजावले आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे. त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करुन काय साध्य करणार?” असा प्रश्नही शिवसेनेने यानिमित्ताने विचारला आहे.

“स्वयंसेवकांची नेमणूक राम मंदिर वर्गणीसाठी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल” असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.

संबंधित बातम्या :

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच, शिवसेनेचा निशाणा

(Ashish Shelar slams Sanjay Raut over Saamna Editorial on Ram Mandir)