
नवी दिल्लीः राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेत कपड्यांवरून तुफ्फान वाद पेटलाय. अत्यंत साधेपणाने यात्रा करणार असा दावा करणाऱ्या राहुल गांधींच्या ब्रँडेड टीशर्टवरून आधी भाजपने टीका केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सूटची किंमतही काँग्रेसने जगजाहीर केली. आता टीशर्ट आणि सूटनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मफलरीलाही वादात खेचण्यात आलंय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यासंदर्भात वक्तव्य केलंय. राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,अमित शहा यांच्या मफलरीची किंमत 80 हजार रुपये आहे. तर भाजपाचे अनेक नेते अडीच लाख रुपयांचा चश्मा घालतात, अशी टीकाही त्यांनी केली.
भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढतेय. याचा भाजपने धसका घेतला आहे, अशी टीका गहलोत यांनी केली आहे. काँग्रेसच्या यात्रेवर काही बोलता येत नाहीये, त्यामुळे राहुल गांधींच्या टीशर्टवर भाजपने टीका केल्याचं गहलोत म्हणाले.
भाजप नेत्यांवर टीका करताना गहलोत म्हणाले, भाजपचे अनेक नेते अडीच लाख रुपयांचा चश्मा परिधान करतात. अमित शाह 80 हजार रुपयांची मफलर वापरतात. राहुल गांधींच्या यात्रेला मोठा जनाधार मिळतोय, त्यामुळे भाजप आता टीशर्टवरून राजकारण करण्यासाठी मजबूर झाले आहे, अशी टीका गहलोत यांनी केली.
जोधपूर दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींवर टीका केली. भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, राहुल बाबा नुकतेच भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. पण तेसुद्धा विदेशी टीशर्ट घालून…
अमित शहा यांनी म्हटले की, राहुल गांधींनी एका भाषणात म्हटलं होतं, भारत हा मुळात देशच नाही…. अमित शहांनी राहुल गांधींना सवाल केला की, राहुल गांधींनी नेमक्या कोणत्या पुस्तकात हे वाचलं? ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी प्राणांची आहुती दिली, तो हा भारत देश आहे, असं वक्तव्य अमित शहांनी केलं.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान घातलेलं टीशर्ट 41 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
यावरून काँग्रेसनेही टीका केली. कपड्यांवर चर्चा करायचीच असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूटदेखील 10 लाख रुपयांचा असून चश्मा दीड लाख रुपयांचा असतो, असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केलंय.