राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याची शिफारस; गेहलोत यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?

| Updated on: Sep 22, 2022 | 5:23 PM

सीपी जोशी आणि गेहलोत यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, 2020मध्ये जोशींनी गेहलोत यांचं सरकार वाचवण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील मैत्री वाढण्यास सुरुवात झाली.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी या नेत्याची शिफारस; गेहलोत यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
गेहलोत यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसचे (congress) अध्यक्ष होणं जवळपास निश्चित झालं आहे. राजस्थान आणि दिल्लीतील घडामोडींवरून तरी सध्या तसं चित्रं दिसतंय. सध्या तरी अशोक गेहलोत यांचं नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये सर्वात वर आहे. त्यामुळे गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास राजस्थानच्या (Rajasthan) मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? अशी चर्चाही सुरू झाली आहे. सचिन पायलट राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी बसणार का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. मात्र, गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी राजस्थान विधान सभेचे विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या नावाची शिफारस केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे पायलट काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सीपी जोशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. गेहलोत यांनी काल बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जोशींच्या नावाची शिफारस केल्याचं सांगितलं जातं. या भेटीनंतरच गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गेहलोत यांनी लढत शशि थरूर यांच्यासोबत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

येत्या फेब्रुवारीत राजस्थानचा अर्थसंकल्प आहे. तोपर्यंत गेहलोत हे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी राहतील, असं सांगण्यात येतं. अर्थसंकल्प पार पडल्यानंतरच ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

सीपी जोशी आणि गेहलोत यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, 2020मध्ये जोशींनी गेहलोत यांचं सरकार वाचवण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील मैत्री वाढण्यास सुरुवात झाली.

ज्यावेळी बंडखोर आमदार मानेसरमध्ये थांबले होते. तेव्हा जोशींनी त्यावेळचे उपमुख्यमंत्री सचिन पायलटसहीत काँग्रेसच्या 19 बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. त्यामुळे गेहलोत यांनी या उपकाराची जाणीव ठेवून जोशींचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्याचं सांगितलं जात आहे.

गेहलोत यांनी काल सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक निष्पक्षपाती होईल, असं आश्वासन सोनिया गांधी यांनी गेहलोत यांना दिल्याचं सांगितलं जातं. या निमित्ताने एक व्यक्ती एक पद हा सिद्धांत समोर येईल, असंही सोनिया यांनी त्यांना सांगितल्याचं कळतं.