ओवेसींकडे रिपोर्ट कार्ड, औरंगाबादेत ‘एमआयएम’ दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार

| Updated on: Mar 09, 2020 | 12:39 PM

पक्षविरोधी काम, असमाधानकारक कामगिरी आणि मतदारांमधील नाराजी यामुळे एमआयएमच्या दहा विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होण्याचे संकेत आहेत. Aurangabad MIM deny candidature to sitting counselors

ओवेसींकडे रिपोर्ट कार्ड, औरंगाबादेत एमआयएम दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीत ‘एमआयएम’ पूर्ण ताकदीनिशी उतरताना दिसत आहे. औरंगाबादमधील ‘एमआयएम’च्या दहा विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीत पक्षाचा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर असेल. (Aurangabad MIM likely deny candidature to sitting counselors)

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ने गुप्त सर्वेक्षण करुन नगरसेवकांची माहिती घेतली. या सर्व्हेचा अहवाल ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना सादर करण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार दहा नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

पक्षविरोधी काम, असमाधानकारक कामगिरी आणि मतदारांमधील नाराजी यामुळे दहा विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होण्याचे संकेत आहेत. सध्या एमआयएमचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजेच 15 विद्यमान लोकप्रतिनिधींना पुन्हा संधी मिळेल. एमआयएम सर्व 112 जागा लढवणार असल्यास जवळपास 100 नवे उमेदवार ‘एमआयएम’च्या तिकीटावर निवडणूक लढवताना दिसतील.

औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे मतदान, मतमोजणी याविषयी अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु त्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. (Aurangabad MIM deny candidature to sitting counselors)

औरंगाबाद निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा मुद्दा पेटला आहे. शिवसेनेने विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. परंतु शिवसेनेची आग्रही भूमिका भाजप आणि मनसे यांनीही उचलून धरल्याने निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, मनसेनेही औरंगाबाद महापालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केलं आहे. औरंगाबादमध्ये मनसे तिथीनुसार शिवजयंती सोहळा साजरा करणार आहे. त्यादृष्टीने औरंगाबादमध्ये मनसेने वातावरणनिर्मितीला सुरुवात केली आहे. मनसे आणि भाजप युती करुन निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसं झाल्यास मनसे-भाजप विरुद्ध एमआयएम विरुद्ध शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होईल.

मनसेने पक्षात पुनरागमन करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेतून आलेले सुहास दशरथे यांच्याकडे निवडणुकांची जबाबदारी सोपवली आहे. जाधव विरुद्ध शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना सर्वात मोठा पक्ष असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने त्यांचं बळ अधिकच वाढलं आहे. परंतु एमआयएम आणि भाजप यांची कडवी झुंज महाविकास आघाडीला मिळणार आहे. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलेल्या मनसेची साथ भाजपला मिळाल्यास निवडणुकीत अधिक रंगत चढेल.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – 29
एमआयएम – 25
भाजप – 22
काँग्रेस – 08
राष्ट्रवादी – 04
इतर – 24
एकूण – 112

 

Aurangabad MIM deny candidature to sitting counselors