Bachchu Kadu : फायनान्स कंपनीने शेतकऱ्याचं घर सील केलं, बच्चू कडूंनी कुलूप तोडलं; म्हणाले, शेतकऱ्यांसाठी असे कायदे…
फायनान्स कंपनीने घर सील केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला बच्चू कडू यांनी घरात प्रवेश मिळवून दिला. हातोड्याने कुलूप तोडल्यानंतर त्यांनी फायनान्स कंपन्यांना कोणता इशारा दिला?

अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील निंबा येथील गोपाल राठोड या शेतकऱ्याच्या घरावर फायनान्स कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार सील लावलं होतं. मात्र, या घटनेची माहिती मिळताच बच्चू कडू यांनी थेट निंबा गाव गाठलं आणि हातोड्याने कुलूप तोडत राठोड कुटुंबाला घरात प्रवेश करून दिला.
गोपाल राठोड यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यातच कोरोना काळात त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. अशा संकटांमुळे कुटुंब अडचणीत असताना फायनान्स कंपनीने दोन दिवसांपूर्वी घर सील केलं होतं. दरम्यान, या कुटुंबाला घरात प्रवेश मिळवून देत बच्चू कडू यांनी फायनान्स कंपन्यांना इशारा दिला आहे. तर गरजू कुटुंबांना त्रास दिला, तर अशा कंपन्यांविरोधात आपला हातोडा तयार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर या कुटुंबाला घराची दारं उघडून देत त्यांची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी केला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
माझ्या डोळ्याला रात्रभर झोप लागली नाही. जेव्हा मला कळलं की या शेतकऱ्यासोबत असं घडलं, मी ठरवलं त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपण त्याच्या घरी जायचं आणि त्या घराचं कुलूप तोडायचं. हा शेतकरी गेल्या चार दिवसांपासून लेकरांना घेऊन बाहेर झोपला. दुष्काळ तोंडावर आहे. शेती कोणी विकत घेईना. हा शेतकरी शेत विकायला तयार होता पण त्याला कोणीही घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या साठी कायदा हातात घेतला. वास्तविक कायदा हातात घेतला नाही पाहिजे पण कायदा शेतकऱ्याच्या मुळावर उठणार असेल तर हे कायदे तोडायला आणि मरायला बच्चू कडू तयार आहे.