भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार, शिवसेना नेतृत्वावर बोलाल तर…

| Updated on: Feb 08, 2021 | 4:34 PM

शिवसेनेच्या नेतृत्वावर असभ्यपणे टीका केली तर यापेक्षा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार, शिवसेना नेतृत्वावर बोलाल तर...
Follow us on

पंढरपूर : वाढीव वीज बिला विरोधातील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी एका भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं होतं. या प्रकरणी अटक झालेल्या 17 शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. जामिनावर सुटका होताच त्यांचा सत्कार करण्यात आलाय. तसंच जर पुन्हा कुणी शिवसेनेच्या नेतृत्वावर असभ्यपणे टीका केली तर यापेक्षा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.(Bail granted to Shivsena party workers in Pandharpur)

वीज बिल विरोधातील आंदोलनादरम्यान भाजपचे माजी उपजिल्हाअध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर कटेकर यांना गाठत काही शिवसैनिकांनी त्यांना काळं फासलं. त्याचबरोबर त्यांना साडी नेसवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. शिवसेनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष रवी मुळे ,संदीप केंदळे ,सुधीर अभंगराव ,लंकेश बुरांडे सह 25 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलाय. त्यातील 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

17 शिवसैनिकांना अटक आणि जामीन

शिरीष कटेकर यांना शिवसैनिकांनी काळं फासल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी त्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 17 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सोमवारी सकाळी त्यांना जामीन मंजूर झाला. जामीन मिळालेल्या शिवसैनिकांचा सत्कार शिवसेना समन्वयक शिवाजी सावंत यांनी केलाय. त्याचबरोबर यापुढे शिवसेना नेतृत्वाबद्दल अशा प्रकारची टीका केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असाही इशारा शिवसेनेनं दिला आहे.

शिवसैनिक संतप्त का झाले?

“सांगली, सातारा परिसरात अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण, आता मात्र त्यांनी फक्त 5 हजार रुपये दिले. सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करु असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्रीपदी बसले. बायकोचं लुगडं धरुन घरात बसतो. बाहेर पडत नाही. का तर कोरोना होईल म्हणून”, अशा शब्दात कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.

वाढीव वीज बिलाविरोधात शुक्रवारी भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. अनेक शहरांमध्ये महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. पंढरपूरमध्येही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान?, शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं, नेसवली साडी!

पंढरपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Bail granted to Shivsena party workers in Pandharpur