लसी कमी, पोस्टर जास्त, ‘मातोश्री’च्या अंगणातील काँग्रेस आमदाराचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

| Updated on: May 14, 2021 | 9:16 AM

झिशान यांनी आपल्या ट्विटरवर लसीकरण केंद्राजवळील शिवसेनेच्या तीन-चार पोस्टर्सचे फोटोही शेअर केले आहेत. (Zeeshan Siddique Shivsena Vaccination Centre)

लसी कमी, पोस्टर जास्त, मातोश्रीच्या अंगणातील काँग्रेस आमदाराचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा
Zeeshan Siddique
Follow us on

मुंबई : वांद्रे पूर्व भागातील नव्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन थेट शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर नाराजी व्यक्त करणारे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात लसी कमी आणि पोस्टर जास्त, असं म्हणत झिशान यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं. (Bandra East Congress MLA Zeeshan Siddique slams Shivsena for posters on Corona Vaccination Centre)

झिशान सिद्दीकी काय म्हणाले?

“वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात आपले स्वागत आहे. इथे लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे!” अशा शब्दात झिशान सिद्दीकी बरसले. झिशान यांनी आपल्या ट्विटरवर लसीकरण केंद्राजवळील शिवसेनेच्या तीन-चार पोस्टर्सचे फोटोही शेअर केले आहेत.

झिशान सिद्दीकी कोण आहेत?

झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे ते सुपुत्र. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व हा हायप्रोफाईल मतदारसंघ जिंकला होता.

वांद्रे पूर्वमधून शिवसेनेकडून माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आलं होतं. तर तत्कालीन आमदार तृप्ती सावंत यांचं तिकीट कापल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. दोघांमधील वादाचा फटका शिवसेनेला बसला आणि झिशान सिद्दीकी यांनी भरघोस मतांसह बाजी मारली. (Zeeshan Siddique Shivsena Vaccination Centre)

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान येते. ‘मातोश्री’च्या अंगणातच काँग्रेसकडून पराभवाचा झटका स्वीकारण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली होती. आपण ठाकरे कुटुंबाच्या मतदारसंघात असल्याने पाच वर्षांनी त्यांनी मला मतदान करावं, इतकं चांगलं काम करण्याची माझी इच्छा असल्याचं झिशान निकालानंतर म्हणाले होते.

झिशान सिद्दीकींची अनिल परबांवर नाराजी

वांद्रे पूर्वमधील लसीकरण केंद्राचं उद्घाटन परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमात डाववल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली होती. माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. स्थानिक आमदार या नात्याने प्रोटोकॉलनुसार या उद्घाटनाला मला का बोलावण्यातं आलं नाही? आपणही लसीकरणाबाबत राजकारण करणार आहात का? असा सवाल आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्वीट करत शिवसेनेला विचारला होता.

‘झिशान सिद्दीकी यांना निमंत्रण द्यायला हवं होतं’

मुंबई महापालिकेकडून प्रत्येक वार्डात लसीकरण केंद्र सुरु करण्यात येत आहे. मला वॉर्ड ऑफिसरचा फोन होता. मला लेखी निमंत्रण नव्हतं. पण लसीकरण केंद्र घराबाहेरच असल्यानं मी जाऊन उद्घाटन केलं. स्थानिक आमदाराच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवं, मी या मताचा असल्याचं परब म्हणाले होता. हा एका वार्डाचा कार्यक्रम होता, विधानसभेचा नाही. तरीही आमदार झिशान सिद्दीकी यांना निमंत्रण द्यायला हवं होतं. प्रोटोकॉल पाळायला हवा होता, असंही परब यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

लसीकरण केंद्राचं उद्घाटन हा वार्डाचा कार्यक्रम, विधानसभेचा नाही, झिशान सिद्दीकींच्या नाराजीवर परबांचं उत्तर

संपूर्ण वेतन मतदारसंघाला, ‘कोरोना’बचावासाठी महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदाराचा प्लॅन

(Bandra East Congress MLA Zeeshan Siddique slams Shivsena for posters on Corona Vaccination Centre)