मला मुख्यमंत्री करा, अन्यथा…; डी के शिवकुमार यांच्या एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण

D K Shivkumar on Karnataka CM : मुख्यमंत्रिपदावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण; डी के शिवकुमार की सिद्धरामय्या? पेच सुटेना

मला मुख्यमंत्री करा, अन्यथा...; डी के शिवकुमार यांच्या एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण
| Updated on: May 17, 2023 | 12:17 PM

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. 22 वर्षांनंतर बहुमत मिळालं. त्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यापैकी कुणाला मुख्यमंत्रिपद द्यायचं यावरून खलबतं सुरू आहेत. कुणाला राज्याच्या प्रमुखपदी विराजमान करायचं यासाठी काँग्रेसमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. 13 मेला कर्नाटकचा निकाल लागला. चार दिवसांनंतरही कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाहीये. अशातच डी के शिवकुमार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झालाय.

‘ते’ एक वाक्य

सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणालेत.

डी के शिवकुमार यांच्या या वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं बोललं जातंय. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यांच्या निर्णयाकडे काँग्रेस नेत्यांसह कर्नाटकच्या जनतेचं लक्ष लागलंय.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून खर्गे अंतिम निर्णय घेणार आहेत. कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत बंगळुरूमध्ये घोषणा होऊ शकते, अशी माहिती आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर आणखी एका आमदाराचा दावा

दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर आणखी एका आमदाराने दावा केला आहे.  काँग्रेसचे नेते जी परमेश्वर यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. माझ्यासोबत 50 आमदार आहेत. पण पदासाठी पुढे पुढे करणं मला जमत नाही. पण सध्या मी शांत आहे. पण याचाच अर्थ मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असा होत नाही. मनात आणलं तर मी काहीही करू शकतो. असं जी परमेश्वर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींना निर्णय घेण्यात अडचणी होऊ शकते.

कर्नाटकचा निकाल

कर्नाटकात 22 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता आली आहे. 224 पैकी 137 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर भाजपकडे 65 जागा आहेत. 19 जागांवर जेडीएसला यश मिळालंय. तर अपक्ष आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत.