रामदास कदम फॉस्कॉनला ‘पॉपकार्न’ बोलतात, ते कोकणातील जोकर; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

ज्या-ज्यावेळेस महाराष्ट्रात भाजपचे सरकार येतं त्यावेळेस महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला काम देणारे उद्योग गुजरातमध्ये जातात, असा आरोप त्यांनी केला.

रामदास कदम फॉस्कॉनला पॉपकार्न बोलतात, ते कोकणातील जोकर; भास्कर जाधवांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2022 | 5:28 PM

खेमचंद कुमावत, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव: शिवसेना नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी वेदांता फॉस्कॉनवरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (ramdas kadam) यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. रामदास कदम यांना नीट वेदांता फॉस्कॉन (foxconn vedanta project) बोलता येत नाही. त्यांना प्रकल्पाचे नाव नीट घेता येत नाही. ते फॉस्कॉनला पॉपकार्न बोलतात. त्यावरून त्यांची बुद्धिमत्ता काय आहे हे दिसून येतं. कोकणातील लोक रामदास कदमांकडे एक जोकर म्हणून पाहतात. कोकणातील जोकरपेक्षा आम्हीही त्यांना अधिक महत्त्व देत नाही, अशा तिखट शब्दात भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली.

भास्कर जाधव हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतला. तुमच्या बॅनरवर भारतीय जनता पार्टीचे फोटो लागतात. आमच्या बॅनरवर राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे फोटो लागले तर नाही ना?, असा सवाल करत गुलाबराव पाटलांना आम्ही दसरा मेळाव्यातच उत्तर देऊ, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

भास्कर जाधव यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. आम्हाला कुणालाही काही विचारण्याची गरज नाही. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना एखादा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस माईक खेचतात. देवेंद्र फडणवीस काय उत्तर द्यायचे ते सांगतात, असा चिमटा त्यांनी काढला.

मुख्यमंत्र्यांनी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी गिरीश महाजन तोंडावर कागद ठेवून मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना काय उत्तर द्यायचं हे सांगत होते. आता तर महाजन देखील मुख्यमंत्र्यांना प्रॉम्पटिंग करत आहेत. हे संपूर्ण जग बघतंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाजपकडून सातत्याने अशी अहवेलना होत आहे हे आम्हाला बघणं दुर्दैवी आणि वेदना देणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विचारण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या लोकांचे तोंड बंद केले पाहिजे, असंही ते म्हणाले.

2014 ला पहिल्यांदा भाजपचे राज्यात सरकार आलं. तेव्हापासून कित्येक योजना आणि कंपन्या या गुजरातला गेल्या आहेत. गुजरात राज्याच्या विकासाला कोणाचाही विरोध नाही, मात्र केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर काय राग आहे हेच कळत नाही. ज्या-ज्यावेळेस महाराष्ट्रात भाजपचे सरकार येतं त्यावेळेस महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला काम देणारे उद्योग गुजरातमध्ये जातात, असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रातल विद्यमान सरकार सांगतय की, केंद्र सरकार आम्हाला वेदांता फॉस्कॉनपेक्षाही मोठा प्रकल्प देणार आहे. जो मोठा उद्योग देणार आहे, तो केंद्राने गुजरातला द्यावा. मात्र जो आमचा उद्योग आलाय तो तुम्ही गुजरातला नेताय. आहे ते प्रकल्प महाराष्ट्राला देण्याची तुमची दानत नाही, महाराष्ट्राला तुम्ही मोठे प्रकल्प द्याल यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही, असंही ते म्हणाले.