‘भाजपला यापुढे राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही’

'भाजपला यापुढे राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही'


सोलापूर : शहीद हेमंत करकरे यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्याविषयी प्रज्ञासिंह ठाकूरने असे चुकीचे वक्तव्य करणे योग्य नाही. अशा व्यक्तीला भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपला यापुढे राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा कवडीचाही अधिकार नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते माढा मतदारसंघातील नातेपुराच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते.

प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी ठाकूर यांना उमेदवारी दिल्याबद्दल निषेधही व्यक्त केला. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे जाहीर सभा झाली. या सभेनंतर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजय शिंदे, आमदार रामहरी रूपनवर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काशिनाथ देवकाते आदी उपस्थित होते.

माढ्यातून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून संजय शिंदे निवडणूक मैदानात आहेत, तर भाजप-शिवसेना युतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही अॅड. विजय मोरेंना मैदानात उतरवले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल. याच दिवशी राज्यात माढासह 14 जागांवर मतदान होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI