Pankaja Munde: ‘…तर मी बीडमध्येही रॅम्प वॉक करेन’, रॅम्प वॉक वादावरुन पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर!
विरोधक टिका करत असतील तर दुर्दैवी आहे. बीडने जर साडी दिली तर मी बीडमध्येही साडी घालून रॅम्प वॉक करेल," अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला.

Pankaja munde On Ramp Walk Controversy: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, मंत्री पंकजा मुंडे सध्या त्यांनी केलेल्या रॅम्पवॉकवरुन विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.मुंबईमध्ये गँड हयात येथे सुरु असलेल्या बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये त्यांनी रॅम्प वॉक केला ज्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यात शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना मंत्री रॅम्पवॉक करण्यात व्यस्त आहेत अशी टिका त्यांच्यावर होत आहे. विरोधकांच्या या टिकेला आता स्वतः पंकजा मुंडे यांनी उत्तर देत रॅम्पवॉक का केला? याचे कारण स्पष्ट केले आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
“काही दिवसांपूर्वी जालनाई या ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले होते.तिथे अतिशय सुंदर वस्त्रे बनवून ती बाहेर विकली जातात. त्याच्या ब्रँडसाठी मी रॅम्प वॉक केला होता. तो वॉक फॉर कॉज होता, त्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी केला होता. यावरुन विरोधक टिका करत असतील तर दुर्दैवी आहे. बीडने जर साडी दिली तर मी बीडमध्येही साडी घालून रॅम्प वॉक करेल,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला. तसेच रेशीन उद्योगाच्या दृष्टीने मी जालन्यासोबतच बीडमध्येही प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी!
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवरही भाष्य केले.”बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुष्काळाच्या अनुषंगाने मी आल्यावर बैठक घेतली आहे. प्रामुख्याने चारा आणि पाण्याच्या अनुषंगाने ही बैठक होती. आज दुष्काळ हा सर्वांवर आला आहे, त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मागच्या वर्षीही टँकरची गरज पडू नये यासाठी उपाय केले होते,यंदाही हाच प्रयत्न असणार आहे, असंही पुढे बोलताना त्या म्हणाल्या.
दरम्यान, बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पंकजा मुंडे यांनी आज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सजग आणि सतर्क राहून काम करावे असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, निवासी उप जिल्हाधिकारी शिवशंकर स्वामी तसेच कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, जलसंधारण आदी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.