घडामोडी वाढल्या, जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Apr 22, 2023 | 9:37 PM

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आता घडामोडींना वेग येताना दिसतोय. भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

घडामोडी वाढल्या, जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
जितेंद्र आव्हाड
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राम नवमी आणि हनुमान जयंती विषयी केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात आता पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे मुंबई सचिव अॅड विवेकानंद गुप्ता यांनी आव्हाड यांच्या विरोधात मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. “दंगली घडविण्यासाठी हनुमान जयंत आणि राम जयंती साजरी केली जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. याच वक्तव्यव्याप्रकरणी आता त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.

याप्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. “जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य अतिशय आक्षेपार्ह आहे. राम नवमी किंवा हनुमान जयंती असेल अत्यंत शांततेने ती साजरी केली जाते. लोकांच्या मनामध्ये प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्याप्रती प्रचंड श्रद्धा आहे. ती श्रद्धा त्यानिमित्ताने व्यक्त केली जाते. त्यामुळे दंगली करता राम नवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जाते असं म्हणणं हा एक प्रकारे समस्त समाजाचा आणि राम भक्तांचा अपमान आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्रात दंगली होतील असं वक्तव्य करणं, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? तुम्ही दंगली घडवायचं ठरवलं आहे का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. किमान नेत्यांनी अशाप्रकारच्या विधानांमध्ये संवेदनशीलपणे प्रतिक्रिया दिली पाहिजे. प्रत्येक प्रकरणात सनसनाटी निर्माण करणे योग्य नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भूमिका मांडली. “दंगली घडू नये म्हणून मी बोलतोय. सध्याच्या परिस्थितीवर बोलणं कुठे चुकलं? मला कुणाकडूनही हिंदू असण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही. माझ्या वक्तव्यातून कुणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न नाही. दोन्ही गट बाजूला निघून जायचे. हे मी सगळं अनुभवलं आहे. त्यामुळे हे काय घडतंय हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळूच शकत नाही. बोललं नाही तर महाराष्ट्राला कळणार नाही”, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

“मी कट्टर हिंदू आहे. मी वसुधैव कुटुंबकम मानणारा हिंदू आहे. राम आपल्या वडिलांचं ऐकणारा होता. आईचं ऐकणारा राम होता. भावाला सन्मानित करणारा राम होता. तो राम आम्हाला माहीत आहे. समाजात एकता, समता, बंधुत्व मानणारा राम आहे. समाजात एकता ठेवणे शिका. समाजात द्वेष पसरवल्याने देशाचे नुकसान होते”, असं आव्हाड म्हणाले.

“मला कोणत्याही हिंदूचे प्रमाणपत्र नको. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्यांनी मला प्रमाणपत्र दिले आहे. गेल्या वर्षीचा रामजन्मोत्सव बघा. त्यापूर्वीचा रामजन्मोत्सव बघा. असा माहौल नव्हता. पुढं काही होणार असेल तर समाजाला अलर्ट करणे ही माझी जबाबदारी आहे. गेल्यावर्षी रमजानमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. समाजात माहौल खराब होत असेल तर बोलावं लागेल की माहौल डिसटर्ब होतो. देशात काय काय होतो ते बघा. त्यानंतर अंदाज लावा काय काय होणार आहे”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले.