नितेश राणेंनी खंडणीचा आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण आहेत?

| Updated on: Mar 15, 2021 | 3:01 PM

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकाचं नाव घेत थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्ला चढवला आहे. या सगळ्या प्रकरणात खंडणीचा मुद्दा उपस्थित करत नितेश राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

नितेश राणेंनी खंडणीचा आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण आहेत?
Follow us on

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकाचं नाव घेत थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्ला चढवला आहे. या सगळ्या प्रकरणात खंडणीचा मुद्दा उपस्थित करत नितेश राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.(Nitesh Rane accuses Yuvasena secretary Varun Sardesai of ransom)

नितेश राणेंचा आरोप काय?

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचं रॅकेट चालतं. या सगळ्या बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन केला होता आणि त्यांच्याकडे मोठ्या खंडणीची मागणी केली होती, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. सचिन वाझेंकडून बेटिंगवाल्यांना धमकावण्यात आलं. त्यांच्यावरील छापा किंवा अटक टाळायची असेल तर तुम्हाला 150 कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. सचिन वाझे यांनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असं सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचा म्हणजे एकप्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणेंनी केला आहे. या प्रकरणात आता थेट वरुण सरदेसाई यांचं नाव आल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

वरुण सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी

नितेश राणे यांनी फक्त आरोपच केला नाही. तर वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचं संभाषण तपासण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. वरुण सरदेसाई यांच्या कॉलचे सीडीआर एनआयएने तपासावे असं नितेश राणे यांनी म्हटलंय. नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांना दिलेल्या वाय प्लस सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. तसंच वरुण सरदेसाईला सचिन वाझेंना फोन करण्याचा अधिकार कुणी दिला? आपल्या नातेवाईकाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री सचिन वाझेला पाठीशी घालत आहेत का? असा सवाल राणेंनी विचारला आहे.

नितेश राणेंनी आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण?

वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. ते पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ लागतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भगिनीचे ते पुत्र आहेत. वरुण यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदासह शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. वरुण सरदेसाई हे पेशाने सिव्हिल इंजिनिअर आहेत.

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवाली अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.

2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती.

वरुण सरदेसाईंना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी वरुण सरदेसाई यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यावरुनही नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला होता.

संबंधित बातम्या :

वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो पण तो पुढे कुणाला देतो?; नितेश राणेंचा गंभीर आरोप

मोठी बातमी: सचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवले

Nitesh Rane accuses Yuvasena secretary Varun Sardesai of ransom