‘मातोश्रीतला नरक’ हे वेगळं पुस्तक होईल, भाजप आमदाराचे एकदम जिव्हारी लागणारे शब्द

"संदीप देशपांडे यांचा 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वाचतानाचा त्यांचा फोटो मी पाहिलेला नाही. त्यांच्या घरात काय चाललंय हे माझं बघण्याचं काम नाही. मी काय त्यांच्या घरात चहा द्यायला जात नाही. त्यांनी कोणतं पुस्तक वाचावं, नाही वाचावं हा त्यांचा प्रश्न. राज साहेबांनी शिवसेना सोडली. त्यावेळी संजय राजाराम राऊतांची गाडी असंख्य समर्थकांनी जाळलेली. त्याचे फोटो आजही वृत्तपत्र आणि लोकांकडे आहेत"

मातोश्रीतला नरक हे वेगळं पुस्तक होईल, भाजप आमदाराचे एकदम जिव्हारी लागणारे शब्द
sanjay raut news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 05, 2025 | 12:20 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच नुकतच प्रकाशन झालं. आर्थर रोड कारागृहात असताना आलेल्या अनुभवांवर संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. “‘मातोश्रीतला नरक’ हे वेगळं पुस्तक होऊ शकतं. संजय राजाराम राऊतच्या पुस्तकाचा भाग दोन ‘मातोश्रीतला नरक’ असं होऊ शकते” अशी जिव्हारी लागणारी, बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या प्रचाराच्या शुभारंभावरही त्यांनी टीका केली. “ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की, आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे. त्यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आदू बाळासाठी आहे. याबाबत उद्धव ठाकरे स्पष्ट करावं आणि नौटंकी बंद करावी” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

“शरद पवार किंवा त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो, हे सांगण्याचा अधिकार मला नाही. शरद पवारांचे काही उरले-सूरले कार्यकर्ते सोलापुरात असतील तर त्यांना शोधा आणि विचारा” असं नितेश राणे म्हणाले. “आदरणीय राज साहेबांचा अपमान उद्धवजींनी किती वेळा आणि कसा केला याचे एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकते. निष्ठावान मनसैनिक का अस्वस्थ आहे असे तुम्हाला वाटते? अमेय खोपकर, संदीप देशपांडे का अस्वस्थ आहेत? खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार राज ठाकरे असताना देखील त्यांना सगळ्या पद्धतीने त्रास देऊन, अपमानित करून शिवसेना सोडायला लावली” असं नितेश राणे ठाकरे गट-मनसे यांच्या संभाव्य युतीवर म्हणाले.

‘हे माझ्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला विचारा’

“बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे राज ठाकरे शिवसेना बांधत होते. त्यावेळचा शिवसैनिक बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंकडे बघत होता. राज ठाकरेंचा त्यांनी किती वेळा अपमान केला हे माझ्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला विचारा. मातोश्रीतला नरक हे वेगळं पुस्तक होऊ शकते. संजय राजाराम राऊतच्या पुस्तकाचा भाग दोन मातोश्रीतला नरक. त्यावेळी अपमान करायचा आणि रोजी रोटीसाठी राज ठाकरेंना गोंजारत बसायचं असं सुरू आहे” असं नितेश राणे म्हणाले. “राजसाहेब सुज्ञ आहेत. भांडण मिटून दोन ठाकरे एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. मात्र शेवटी राज ठाकरेंचा जो अपमान झाला, ते सर्वजण विसरले नसतील असं मला वाटतं” असं नितेश राणे म्हणाले.