VIDEO | मनोज वाजपेयीच्या चित्रपटातील डायलॉग, राणेंना जामीन मिळाल्यानंतर मध्यरात्री नितेश राणेंचे सूचक ट्वीट

| Updated on: Aug 25, 2021 | 7:34 AM

महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटींसह जामीन मंजूर केल्यामुळे नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजून 47 मिनिटांनी नितेश राणेंनी सूचक ट्वीट करत विरोधकांना इशारा दिला

VIDEO | मनोज वाजपेयीच्या चित्रपटातील डायलॉग, राणेंना जामीन मिळाल्यानंतर मध्यरात्री नितेश राणेंचे सूचक ट्वीट
नितेश राणेंचा ट्विटरवरुन इशारा
Follow us on

मुंबई : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (CM Uddhav Thackeray) कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केल्या प्रकरणी राणेंना अटक करण्यात आली होती. राणेंना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सूचक ट्वीट करत शिवसेना आणि विरोधकांना अप्रत्यक्ष चॅलेंज दिलं आहे. ‘राजनीती’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा व्हिडीओ नितेश राणेंनी शेअर केला आहे.

काय आहे संवाद?

राजनीती चित्रपटात अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेल्या डायलॉगचा व्हिडीओ नितेश राणे यांनी ट्वीट केला आहे. “मगर आसमान में थूकने वाले को शायद यह पता नहीं है, की पलट कर थूक उन्हीं के चेहरे पर गिरेगा, करारा जवाब मिलेगा…. करारा जवाब मिलेगा….” असा हा डायलॉग आहे. मध्यरात्री 12 वाजून 47 मिनिटांनी नितेश राणेंनी हे ट्वीट केले. नारायण राणे आपल्या संपूर्ण कुटुंबासह बुधवारी पहाटे 4 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास मुंबईतील जुहू बंगल्यावर पोहोचले.

पाहा ट्वीट

नारायण राणेंना जामीन

रत्नागिरी पोलिसांकडून अटक होण्यापूर्वी नारायण राणेंनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटींसह जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला.

कोर्टाकडून राणेंना अटीशर्तीसह जामीन

जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

अटक ते जामीन… घटनाक्रम काय

नारायण राणेंना अटक केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांना रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. तिथून त्यांना महाड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर राणेंना रात्री 8.35 वाजताच्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. राणे स्वत:च्या गाडीने आले होते. त्यांच्यासोबत पुत्र नितेश राणे, भाजप नेते प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते. राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या :

नारायण राणे यांना मोठा दिलासा, महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह जामीन मंजूर

नारायण राणेंच्या अटकेनंतर उस्मानाबादेत भाजप-सेना आमनेसामने, आमदार, खासदारांमध्ये ट्विटवॉर

नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, त्यांचं वागणं एखाद्या छपरी गँगस्टरसारखं; सामनातून नको नको त्या 5 उपमा देत ‘प्रहार’!