Anil Bonde | अब पछतानेसे क्या फायदा, चिडीया खेत चुग गई, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर भाजप खासदार अनिल बोंडेंची शायरी

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद हे देवाच्या आशीर्वादाने मिळालं, असं आम्ही मानतो. फडणवीस यांनी पक्षाचा आदेश पाळला, असं उत्तर अनिल बोंडेंनी दिलं.

Anil Bonde | अब पछतानेसे क्या फायदा, चिडीया खेत चुग गई, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर भाजप खासदार अनिल बोंडेंची शायरी
भाजप खासदार अनिल बोंडे
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 10:27 AM

अमरावतीः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेल्या आमदारांना झाडावरून गळून पडलेल्या पाला पाचोळ्याची उपमा दिली आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अमरावतीचे भाजप खासदार अनिल बोंडे यांनीदेखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याच. मात्र शिवसेनेवर ओढवलेल्या परिस्थितीवरही खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांना पाला पाचोळा म्हटलं एवढी दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली, असे अनिल बोंडे म्हणाले. तर अब पछतानेसे क्या फायदा, चब चिडीया खेत चुग गई.. अशी शायरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याबाबत उद्धव ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलं, यावरही अनिल बोंडेंनी प्रतिक्रिया दिली.

अनिल बोंडे काय म्हणाले?

अनिल बोंडे यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद हे देवाच्या आशीर्वादाने मिळालं, असं आम्ही मानतो. फडणवीस यांनी पक्षाचा आदेश पाळला, असं उत्तर अनिल बोंडेंनी दिलं. भाजपला मुंबई तोडायची आहे, असा आरोपही केला जातोय, यावर उत्तर देताना अनिल बोंडे म्हणाले, आता ते काहीही आवई उठवतील. मराठी माणूस तोडायचाय, मुंबई तोडायचीय. पण देवेंद्र फडणवीसांनी आधीच स्पष्ट केलंय. संपूर्ण मराठी माणसांना ते एकत्र आणणार आहेत. ..

टेक्सटाइल पार्क अमरावतीतच होणार

अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथील टेक्स्टाइल पार्क औरंगाबादला पळवलं जाणार असल्याचे आरोप केले. यावर उत्तर देताना अनिल बोंडे म्हणाले, ही पळवापळवी काँग्रेसच्या काळात चालायची. आता ते होणार नाही. अमरावतीचं टेक्सटाइल पार्क अमरावतीतच होणार आहे..

पाचोळ्यावरून उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आमदारांनी अचानक बंड केल्यामुळे शिवसेनेत वादळ आलं असून यामुळे पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं बोललं जातंय. यावर उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणाले, शिवसेनेत वादळ आलंय हे नक्की. मात्र ही काही दिवसांपुरती अस्वस्थता आहे. एखाद्या झाडाची पानगळ सुरु होते. तेव्हा सडलेली पानं झडून जातात. वाऱ्याच्या वेगामुळे पाला पाचोळा गळून जातो. त्यानंतर माळी येतो, केराच्या टोपलीत ही सगळी पानं भरतो आणि निघून जातो. त्यानंतर झाडांना नवी पालवी फुटते. झाड बहरून येतं. शिवसेनेचंही असंच होणार आहे. तरुण शिवसैनिकांची शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर भरती सुरु आहे. तर ज्येष्ठ शिवसैनिकांचे आशीर्वादही पक्षासोबत आहेत…