बाळासाहेबांना तुम्ही वचन दिलं, पवार-सोनियांनी नाही, भाजपचा टोला

| Updated on: Nov 12, 2019 | 11:06 AM

उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं वचन दिल्यावरुन भाजपने निशाणा साधला.

बाळासाहेबांना तुम्ही वचन दिलं, पवार-सोनियांनी नाही, भाजपचा टोला
Follow us on

मुंबई : ‘तुम्ही भले वचन दिले असेल, शरदराव आणि सोनियांनी थोडेच वचन दिलंय’ असं म्हणत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला. शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवणार, या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिलेल्या वचनावरुन भाजपने निशाणा (BJP Taunts Uddhav Thackeray) साधला.

‘शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, असं वचन तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना भले दिलं असेल. पण शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी तसं वचन दिलेलं नाही’ असा टोमणा अवधूत वाघ यांनी शिवसेनेला लगावला. ‘राष्ट्रवादीचं घड्याळ घालूनही वेळ पाळता आली नाही. कारण घड्याळ बिघडलेलं होतं’ असंही वाघ पुढे म्हणाले. अवधूत वाघ यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

अवधूत वाघ यांनी काल सकाळपासूनच शिवसेनेवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर केलेल्या टीकात्मक पोस्ट, भाषणं, फोटो वाघ यांनी ट्वीट केले होते.

शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतची वेळ दिली होती. मात्र शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रं सादर करता आली नाहीत. त्यामुळेच राज्यपालांनी आता विधानसभेमध्ये निवडून आलेला तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. आज (मंगळवारी) रात्री साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, काँग्रेस नेत्याला विश्वास

शिवसेनेची सोबत येण्याची इच्छा नसल्याचं सांगत भाजपने रविवारी सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी संधी दिली. शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागली. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या बैठकांचं सत्र सुरु होतं. त्यातच झालेल्या दिरंगाईमुळे शिवसेनेला केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रं राज्यपालांकडे सादर करता आली (BJP Taunts Uddhav Thackeray) नाहीत.