
नवी दिल्ली: शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (arjun khotkar) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांच्यात अखेर मनोमिलन झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जालन्यातील या दोन्ही बड्या नेत्यांचे मनोमिलन झालं आहे. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी थेट दानवे यांच्या घरी जाऊन ब्रेकफास्ट केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत जालन्यातील राजकारणावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. या बैठकीनंतर खोतकर आणि दानवे दोघेही मीडियाला सामोरे गेले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाला शिंदे गट म्हणून नका. ती मूळ शिवसेना आहे. आणि अर्जुन खोतकर हे मूळ शिवसेनेतच आहेत, असं म्हटलं. त्यामुळे खोतकर शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे.
राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नाही. शत्रू नाही. क्षणिक काही गोष्टी घडतात आणि त्यातून मतभदे वाढत असतात. मी आणि अर्जुन खोतकर राज्यात आमचं सरकार नसतानाही आम्ही 25 वर्ष जिल्हा परिषद आम्ही ताब्यात ठेवली. डिसीसी बँक आम्ही ताब्यात ठेवली. सेना भाजपनं त्याही वेळी जालना जिल्ह्यावर वर्चवस्व ठेवलं होतं. आजही त्यांनी उल्लेख केला ते शिवसेनेत आहे. ही गोष्ट खरी आहे ते शिवसेनेत आहेत. आजही राज्यात सेना-भाजपचं सरकार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेट झाली. चर्चा झाली. आम्ही एकमेकांच्या तोंडात साखर टाकली. मतभेद दूर झाले. आमचे मतभेद दूर झाले आहेत. माझ्या मतानुसार ते कन्व्हिन्स झाले आहेत. त्यानंतर मी खोतकर यांना चहाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार ते आले, सुरेश नवलेही आले. आम्ही एकत्र आमदार होतो. मित्रत्वाच्या नात्याने आले, असं सांगतानाच शिंदे गट नाही. ही मूळ शिवसेना आहे. शिवसेना आणि भाजपला २०१९ ला जनतेने बहुमत दिलं होतं. तीच शिवसेना तुमच्यासमोर आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, काल अर्जुन खोतकर दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते. शिंदे आणि फडणवीस यांच्या पुढाकाराने या दोन्ही नेत्यांमधील वाद संपुष्टात आणला गेला. दोघांचे मनोमिलन झाले. त्यामुळे खोतकर यांनी शिवसेनेला सोडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.