शिवसेनेत वादळ, ओमराजेंविरोधात गुन्हा, सेना खासदारचीच तक्रार

शिवसेनेत वादळ, ओमराजेंविरोधात गुन्हा, सेना खासदारचीच तक्रार

उस्मानाबाद : शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

ओम राजे यांच्या व्हायरल क्लीपप्रकरणी खासदार रवींद्र गायकवाड यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कलम 65 , 66 , 67 आणि आयपीएसीच्या  500 , 501 , 502, 504 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये ओम राजे यांनी अश्लील भाषा वापरून शिवीगाळ आणि चारित्र्य हनन केल्याचा आरोप आहे.

रवींद्र गायकवाड हे उस्मानाबादमधून शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र, यंदा शिवसेनेने रवींद्र गायकवाड याचं तिकीट कापलं आणि दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं. त्यामुळे रवींद्र गायकवाड नाराज आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत प्रयत्न करुन पाहिले. मात्र, त्यांना तिकीट मिळालंच नाही. ओमराजे निंबाळकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला. उस्मानाबादमधील शिवसेनेतील वाद गेल्या काही दिवसात वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र गायवाड विरुद्ध ओमराजे निंबाळकर या वादाचा फायदा रणाजगतीसिंह पाटील यांना होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्याच्या सुसाईड नोटमुळे खळबळ

उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केली. घटनास्थळी  सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख असल्याने एकच खळबळ उडाली. मात्र ओम राजे यांनी कारखान्याने बँकेत रक्कम जमा केली होती, त्यात बँकेची चूक असल्याचा दावा केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *