शिवसेना नगरसेविकांची हाणामारी, नगरसेविकेविरुद्ध पोलिसात तक्रार

| Updated on: Jun 12, 2019 | 10:31 AM

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) शिवसेना नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिवसेना नगरसेविकांची हाणामारी, नगरसेविकेविरुद्ध पोलिसात तक्रार
Follow us on

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) शिवसेना नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, शिवसेना नगरसेविका आशालता बाबर यांनी केली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या तक्रारीची नोंद झाली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

या दोन्ही नगरसेविकांमध्ये पाण्याच्या मुद्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शिवसेना नगरसेविका आशालता बाबर यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्यावर मारहाणीचा आरोप आहे. शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयासमोर हा वाद झाला होता.

एका सोसायटीच्या पाणी कनेक्शनवरुन दोन्ही नगरसेविकांमध्ये खडाजंगी झाली. बाचाबाचीनंतर प्रेमा म्हात्रे यांनी आशालता बाबर यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. मात्र मारहाण केली नसल्याचा दावा नगरसेविका म्हात्रे यांनी केला.

आशालता बाबर या नांदिवली मिनल पार्क या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. रवीकिरण सोसायटीच्या पाणीप्रश्नावरुन बाबर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला. या सोसायटीला पाणी दिल्यास आपल्या प्रभागात परिणाम होईल म्हणून बाबर आणि म्हात्रे आमने सामने आल्या. वादावादीनंतर हा मुद्दा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आणि त्यानंतर चर्चेसाठी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयात गेला.

त्यावेळी झालेल्या झटापटीत प्रेमा म्हात्रे यांनी आशालता बाबर यांना कानशिलात मारल्याचा आरोप आहे.