अमित शाहांच्या ‘देखते हैं’चा अर्थ उद्धव ठाकरेंनी ‘हो’ असा घेतला!, ‘त्या’ बंद दाराआडच्या चर्चेचा चंद्रकांतदादांकडून उलगडा?

| Updated on: Feb 14, 2021 | 9:52 PM

बंद दाराआडच्या चर्चेत नेमकं काय घडलं? कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं? हे राज्यातील सर्वसामान्य मतदारांना समजणं शक्यच नाही.

अमित शाहांच्या देखते हैंचा अर्थ उद्धव ठाकरेंनी हो असा घेतला!, त्या बंद दाराआडच्या चर्चेचा चंद्रकांतदादांकडून उलगडा?
Chandrakant Patil
Follow us on

सांगली : भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेचा प्रत्येक नेता सांगतो. तर मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता, असा दावा खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे त्या बंद दाराआडच्या चर्चेत नेमकं काय घडलं? कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं? हे राज्यातील सर्वसामान्य मतदारांना समजणं शक्यच नाही. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी त्या बंद दाराआडच्या चर्चेचा उद्धव ठाकरे यांनी कसा चुकीचा अर्थ घेतला, हे सांगलीत सांगितलं आहे.(Chandrakant Patil explains the conversation between Shiv Sena and BJP leaders)

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह यांनी ‘देखते हैं’ असं म्हटलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी त्याचा अर्थ ‘हो’ असा घेतल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. सांगली महापौर निवडीचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणेच काही झालं असेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो. कारण, शेवटी हे राजकारण आहे.

अमित शाह काय म्हणाले?

अमित शाह यांनी कणकवली येथील कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले नव्हते, असा खुलासा केला. तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचे बोलणे झालेले नाही, सांगतानाच यांनी पंतप्रधान मोदी यांची मोठी पोस्टर्स लावून तत्वासाठी मते मागितली. त्यावेळी आम्ही मंचावरून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, ते मुख्यमंत्री बनतील असे सतत सांगत होतो. त्यावेळी तुम्ही काही का बोलला नाहीत, असा अमित शाह यांनी उपस्थित केला होता.

शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती असेही शाह यांनी म्हटले होते.

संजय राऊतांचं प्रत्युत्तर

जेव्हा जेव्हा शिवसेनेला संपवण्याची भाषा झाली तेव्हा शिवसेना अधिक झळाळून उठली आहे, अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. 1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटमधून संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, संजय राऊत यांच्या ट्विटमुळे एकप्रकारे काँग्रेस नेते कशाप्रकारे तोंडघशी पडले, हे प्रतित होत आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत डावलले जात असल्यामुळे अगोदरच असंतुष्ट असलेल्या काँग्रेसच्या नाराजीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका

वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?; अरविंद सावंतांनी उडवली खिल्ली

Chandrakant Patil explains the conversation between Shiv Sena and BJP leaders