हिंदी सक्तीवरून चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत…

राज्यभरात हिंदी सक्तीला विरोध केला जातोय. राज ठाकरेंनीही तशीच भूमिका घेतली आहे. असे असतानाच आता चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना सल्ला दिलाय.

हिंदी सक्तीवरून चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत...
raj thackeray and chandrakant patil
| Updated on: Jun 22, 2025 | 5:35 PM

Chandrakant Patil On Raj Thackeray : इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी विषय लागू करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा महाराष्ट्रात अनेक पातळ्यांवर विरोध केला जात आहे. विरोधकांनीदेखील हिंदी सक्ती नसायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी तर या धोरणाला कठोर विरोध केल आहे. यावरच आता भाजपाचे नेते तथा उच्चं व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. फडणवीसांसोबत बसून हा विषय समूजन घ्यावा, असं ते म्हणालेत.

…तर विरोध करण्याचं कारण नाही

हिंदी भाषेची सक्ती केली आहे, हे समज चुकीचा आहे. लोकांमध्ये हा गैरसमज आहे. अशी एखादी तिसरी भाषा देशभरात जाण्यासाठी, देशभरातील गोष्टी समजून घेण्यासाठी उपयोगी असेल तर विरोध करण्याचं कारण नाही. त्यामुळे सक्तीचा शब्द कुठून आला हेच मला समजत नाही, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून…

तसेच राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केलेला आहे. त्याबाबत विचारले असता, राज ठाकरे हे खूप चांगले नेते आहेत. ते खूप गोष्टी परखडपणे मांडतात. पण या विषयात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून ही भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला चंद्रकात पाटील यांनी राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरे यांची भूमिका काय?

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या धोरणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आपल्या काय देणंघेणं त्याच्याशी. पण महाराष्ट्रात जेंव्हा अशी सक्ती आली तेंव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहणार, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.