संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर, अनिल परबांनाही इशारा

| Updated on: Aug 28, 2021 | 5:49 PM

शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि इशारा मालिका सुरु झालीय. शिवसेना खासदार संजय राऊत हे साधे नगरसेवकही झाले नाहीत. त्यांनी कोण शाहणं आणि कोण वेडं हे ठरवू नये. ते मतपेटीतून लोक ठरवतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय.

संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर, अनिल परबांनाही इशारा
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि इशारा मालिका सुरु झालीय. शिवसेना खासदार संजय राऊत हे साधे नगरसेवकही झाले नाहीत. त्यांनी कोण शाहणं आणि कोण वेडं हे ठरवू नये. ते मतपेटीतून लोक ठरवतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. तर अनिल परब यांच्या विरोधात तक्रार तयार झाली आहे. प्रो अॅक्टिव्हली स्वत:हून अॅक्शन होण्याची शक्यता आहे, आम्ही त्याची वाट पाहतोय. अन्यथा आम्ही लवकरच तक्रार करु, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. (Chandrakant Patil’s reply to Sanjay Raut, Supriya Sule’s criticism)

सुप्रिया सुळे कधीपासून युतीच्या प्रवक्त्या झाल्या असा सवालही पाटील यांनी यावेळी केलाय. शिवसेना-भाजप युतीची शक्यता नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्रानं मराठा आरक्षण प्रश्नी सर्व प्रश्न सोडवले आहेत. आता अनेक गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे त्या प्रश्नांची सोडवणूक राज्य सरकारनं करणं गरजेचं असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. एकनाथ खडसे यांच्यावर सक्तवसुली संचलनालय (ईडी)ने कारवाई सुरु केली आहे. सीडी लावायचा निर्णय आता त्यांनीच घ्याव. मात्र, भाजपमध्ये कुणी चुकीचं वागलं तर त्याच्यावर कारवाई होतेच, असा टोला पाटील यांनी खडसेंना लगावलाय.

कुंडल्या आमच्याकडेही आहेत – राऊतांचा इशारा

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आणि नेत्यांची सगळी प्रकरणं मी हळूहळू बाहेर काढतो, असा उघड इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर राऊतांनी राणेंना दिलं आहे. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. आज शिवसेनेच्या कार्यक्रमात राऊतांनी राणेंचे अक्षरश: वाभाडे काढले तसंच जे वादळ उठलंय ते अद्याप संपलेलं नाही, असं म्हणत राणेंना एकप्रकारे इशाराच दिला.

‘युती व्हायला ती काही इन्स्टंट कॉफी नाही’

‘शिवसेना-भाजपचे नेते भेटतात, त्यात काही चुकीचं नाही. राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. शिवसेना-भाजपचे नेते भेटले की लगेच युती व्हायला ती काही इन्स्टंट कॉफी नाही आणि अशा घटनांवर तातडीनं प्रतिक्रिया द्यायाला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावरुन पाटील यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

इतर बातम्या :

जठार यांच्यापाठोपाठ निलेश राणे म्हणाले, दिसेल तिथे संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू

‘काही जित्राबं लय वाईट असतात’, अजित पवारांच्या सडेतोडपणाचे 8 पुरावे, वाचा सविस्तर