भुजबळ थेट रुग्णालयातून राष्ट्रवादीच्या तातडीच्या बैठकीला, राजकीय उलथापालथीच्या हालचाली!

| Updated on: Nov 02, 2019 | 2:52 PM

राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रवाना झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे दोनच दिवसापूर्वी छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

भुजबळ थेट रुग्णालयातून राष्ट्रवादीच्या तातडीच्या बैठकीला, राजकीय उलथापालथीच्या हालचाली!
Follow us on

Chhagan Bhujbal NCP meeting मुंबई : भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन राडेबाजी सुरु असताना, तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यापरीने सत्तेची चाचपणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांनी म्हणजेच 4 नोव्हेंबरला ही भेट नियोजित आहे. मात्र या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (Chhagan Bhujbal NCP meeting) नवनवी रणनीती आखत आहे. ही रणनीती ठरवण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या जोर-बैठका सुरु आहेत.

राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रवाना झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे दोनच दिवसापूर्वी छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जसलोक हॉस्पिटलवरुन डॉक्टरांच्या परवानगीने भुजबळ बैठकीकडे रवाना होत आहेत. भुजबळ थेट रुग्णालयातून राष्ट्रवादीच्या बैठकीत जात असल्याने, ही बैठक तितकीच महत्त्वाची आणि राजकीय उलथापालथ घडवणारी ठरते की काय असा प्रश्न आहे.

यापूर्वी शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. काँग्रेसचे नेते त्याबाबत सोनिया गांधी यांनाही भेटले.

शरद पवार नाशिक दौरा आटोपून मुंबईत

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचा नाशिक दौरा संपवून मुंबईत आले आहेत. (Sharad Pawar meet Sonia Gandhi). शरद पवार हे मुंबईहून दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या 4 नोव्हेंबरला शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती आहे (Sharad Pawar meet Sonia Gandhi).

महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही सोनिया गांधींची भेट घेतली

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल (1 नोव्हेंबर)दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती आणि सत्ता स्थापनेवर चर्चा झाली. त्यानंतर आता शरद पवारही सोनिया गांधी यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे.

संजय राऊत यांचा भाजपला इशारा

यापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेने मनात आणलं तर आम्ही बहुमत मिळवू शकतो, असा थेट इशारा भाजपला दिला होता. तसंच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असंही संजय राऊत यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणाला एक रंजक वळण येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही रुग्णालयात दाखल, उपचार सुरु  

खडसेंच्या मुलीला पाडणं ही भाजपची चाणक्यनीती : छगन भुजबळ