पेट्रोलनंतर आता विमानाच्या इंधनातही इथेनॉल मिसळणार? सरकारकडून मोठी अपडेट, खरं काय ते सांगून टाकलं
आता पेट्रोलनंतर विमानात वापरणाऱ्या ATF मध्येही इथेनॉल मिश्रण करणार आहे असा दावा केला जात आहे. आता यावर सरकराने स्पष्टीकरण देत गोंधळ दूर केला आहे.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण (ई20) कार्यक्रमामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्चात दरवर्षी सुमारे 4 अब्ज डॉलर्स (सुमारे 38,000 कोटी रुपये) वाचू शकतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती देताना सांगितले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि परकीय चलन बचतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. आता पेट्रोलनंतर विमानात वापरणाऱ्या ATF मध्येही इथेनॉल मिश्रण करणार आहे असा दावा केला जात आहे. आता यावर सरकराने स्पष्टीकरण देत गोंधळ दूर केला आहे सरकारने स्पष्ट केले आहे की एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये इथेनॉल मिसळण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आणि बेजबाबदारपणाचा आहे, असे सरकारने म्हटले आहे.
सरकारचा असा कोणताही प्रस्ताव नाही. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, सूत्रांकडून त्यांना असे समजले आहे की सरकार एटीएफमध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना आखत आहे. त्यांनी सांगितले की, तज्ज्ञांच्या मते याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इथेनॉल आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (एसएएफ) पूर्णपणे भिन्न आहेत आणि ते एकमेकांमध्ये मिसळले जाऊ नयेत. एसएएफ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित असलेले हवाई इंधन आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने मान्यता दिली आहे आणि ते जगभरात स्वीकारले गेले आहे. त्याची कठोर चाचणी केली जाते आणि ते कडक जागतिक सुरक्षा मानकांची पूर्तता करते.”
Sources indicate that Modi govt plans to mix ethanol in Aviation Turbine Fuel (ATF). Experts say that this cud seriously compromise the safety of flights
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 6, 2026
ते पुढे म्हणाले की, हवाई सुरक्षेबद्दल चुकीची माहिती पसरवल्याने हवाई प्रवाशांमध्ये केवळ अनावश्यक चिंता निर्माण होते. प्रवासी सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात इथेनॉल-मिश्रित पेट्रोल किंवा ई20 बाबत चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर असे दावे केले जात आहेत की, याचा वाहनांच्या इंजिनवर परिणाम होतो आणि इंधन कार्यक्षमतेवर (मायलेजवर) परिणाम होतो.
आज ‘X’ वरील एक लेख शेअर करत केजरीवाल यांनी म्हटले आहे की, देशात एटीएफमध्ये इथेनॉल आणि इतर कृत्रिम हायड्रोकार्बन्स मिसळण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यांनी लिहिले, “तुमच्या विमानाचे इंजिन ऐन उड्डाणात बंद पडू शकते. भेसळयुक्त विमान इंधनावर चालणाऱ्या विमानातून प्रवास करणे तुम्हाला परवडेल का?”