Explainer : ‘कॉकरोच’ जिंकले, भाजपा बॅकफुटवर, प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे काय बदलणार? 4 मुद्द्यात समजून घ्या!

आता सीजेपीचे आंदोलन संपलेले आहे. परंतु या आंदोलनामुळे नेमकं काय बदललं? भारताच्या आगामी काळातील राजकारणात काय बदल होणार? विरोधकांना याचा नेमका काय फायदा होणार? भाजपाला काय फटका बसू शकतो? देशातील तरुणांनी काय संदेश दिला? हे चार मुद्दे समजून घेऊ या...

Explainer : कॉकरोच जिंकले, भाजपा बॅकफुटवर, प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे काय बदलणार? 4 मुद्द्यात समजून घ्या!
CJP DELHI PROTEST AND 2029 LOK SABHA ELECTION
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 7:29 PM

CJP Protest : गेल्या अनेक दिवसांपासू कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू होते. नीट पेपर घोटाळ्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नीट पेपर घोटाळ्यसाठी जबाबदार धरत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सीजेपीची होती. ही मागणी सरकारने मान्य केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. सोबतच सीजेपीच्या अन्य दोन मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता सीजेपीचे आंदोलन संपलेले आहे. परंतु या आंदोलनामुळे नेमकं काय बदललं? भारताच्या आगामी काळातील राजकारणात काय बदल होणार? विरोधकांना याचा नेमका काय फायदा होणार? भाजपाला काय फटका बसू शकतो? देशातील तरुणांनी काय संदेश दिला? हे चार मुद्दे समजून घेऊ या…

1) तरुणांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करावं लागणार

कॉकरोच जनता पार्टीचे हे आंदोलन देशातील लाखो तरुणांनी आपल्या हातात घेतले होते. देशभरातून वेगवेगळ्या शहरात तरुण एकवटलेले दिसले. विशेष म्हणजे जमेल त्या मार्गाने देशातील जेन झी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर जमा झाले. सोनम वांगचूक उपोषणाला बसलेले असताना सुरुवातीच्या दिवसात या आंदोलनाला म्हणावा तेवढा प्रतिसाद नव्हता. परंतु 20 जुलै रोजी पोलिसांनी संसद मार्चवर केलेला लाठीचार्ज तरुणांना एकत्र येण्यास कारणीभूत ठरला. म्हणूनच हजारो तरुण दिल्लीत जमा झाले. या आंदोलनामुळे देशातील तरुणांमध्ये किती ताकद आहे? हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. तरुण एकत्र आले तर सत्तेला हादरा बसू शकतो, भविष्यात कदाचित सत्तांतरही होऊ शकतो, असा संदेश आता भारतातील कोट्यवधी जनतेला गेला आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजपाला तरुणांना, तरुणांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवूनच पुढील राजकारण करावे लागणार आहे. तरुणांकडे दुर्लक्ष करणं कदाचित भविष्यात सत्ताधारी भाजपाला धोकादायक ठरू शकतं.

2) विरोधकांमध्ये नवचैतन्य, सूर गवसला

विरोधकांच्या मागण्या काय आहेत, या तरुण पिढीला काय हवं आहे, या गोष्टी लक्षात घेऊनच आता सत्ताधारी तसेच विरोधकांना आपले राजकीय डावपेच आखावे लागतील. गेल्या साधारण 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच केंद्रातील मोदी सरकारला आपल्या मंत्रिमंडळातील नेत्याचा राजीनामा घेण्याची नामुष्की ओढावली आहे. या आंदोलनात काँग्रेस तसेच इंडिया आघाडीतील इतरही घटकपक्षांनी संसद दणाणून सोडली. सीजेपीचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या विरोधकांनी लावून धरल्या. पुढे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे केलेले ठिय्या आंदोलन, गांधी स्मृती भवनात जाऊन गायलेले राष्टगीत यामुळेही विरोधकांची ताकद दिसली. विरोधकांनी एकवटून विरोध केल्यामुळे मोदी सरकारवर एका प्रकारे दबाव वाढला. हे संपूर्ण आंदोलन सीजेपीचे असले तरीही यामुळे विरोधकांमध्ये मात्र नवचैतन्य निर्माण झाले आहे. सीजेपीने विरोधकांमध्येही संजीवनी पेरली आहे.

3) भाजपाने नेमकं काय गमावलं?

सलग तिसऱ्यांदा सत्तेत असलेलं मोदी सरकार हे विकासाचा दुसरा चेहरा आहे, असा दावा भाजपाकडून केला जातो. भारताला आम्हाला विकसित भारत बनवायचं आहे, असंही सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातं. परंतु सध्याच्या सीजेपी आंदोलनामुळे तरुणांच्या मनात काय आहे? हे समोर आलं आहे. तरुणांचे प्रश्न काय आहेत? त्यांच्या शिक्षणाच्या, नोकरीच्या समस्या किती गंभीर आहेत याचीही एका प्रकारे प्रचिती आली. म्हणूनच तरुणांच्या आणि विरोधकांच्या वाढत्या रेट्यामुळे तब्बल 12 वर्षांतून पहिल्यांदाच दबावापोटी मोदी यांना आपल्याच मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. मोदी सरकार तसेच भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या आंदोलनामुळे तसेच प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी भाजपा बॅकफुटवर गेल्याचे बोलले जातेय. सध्या समोर आलेला हा असंतोष शमवण्यासाठी आता भाजपाला काम करावे लागणार आहे. तरुणांचा राग शांत करून त्यांना पुन्हा एकदा भाजपाकडे वळवण्याचे शिवधनुष्य आता भाजपाला पेलावे लागणार आहे. त्यानुसारच भाजपाला आपली रणनीती आता भविष्यात आखावी लागेल.

4) 2029 च्या निवडणुकीत नेमकं काय बदलणार?

सध्या सलग तिसऱ्यांदा मोदी सत्तेत आहेत. आता पुन्हा एकदा सत्तेत यायचे असेल तर मोदी यांना तरुणांच्या या असंतोषाला केंद्रस्थानी ठेवूनच काम करावे लागेल. तर विरोधकांना तरुणांच्या या असंतोषाला वाट करून सत्तेची चावी शोधावी लागणार आहे. त्यामुळे 2029 सालची निवडणूक कदाचित तरुणांना केंद्रस्थानी ठेवूनच लढवली जाऊ शकते. 2014 सालची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरोधात होती. 2019 तसेच 2024 सालची निवडणूकही विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली. पण आता 2029 सालची निवडणूक ही तरुण आणि तरुणांचे भवितव्य याच मुद्द्यावर कदाचित लढवली जाऊ शकते. त्यासाठी काँग्रेसने अगोदरपासूनच तयारी चालू केली आहे. राहुल गांधी हे तरुणांच्या कायम संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे या आंदोलनानंतर आता मोदी यांनीदेखील आपल्या नेत्यांना, मंत्र्यांना इन्स्टाग्रामसारख्या माध्यमावर सक्रीय राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता 2029 सालची निवडणूक ही तरुणांची असं म्हणायला हककत नाही. सोबतच सीजेपी भविष्यात राजकारणात उतरलीच तर राजकारणाचे चित्रही कदाचित वेगळे असू शकते. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us