चूक नाही तर घाबरता का? कायदा हाती घेतला तर कारवाई निश्चित : मुख्यमंत्री

| Updated on: Aug 19, 2019 | 5:34 PM

मुख्यमंत्री म्हणाले, “राज ठाकरेंना ईडीने पाठवण्यात आलेल्या नोटीसबाबत मला माध्यमांकडूनच समजलं. चौकशीसाठी ईडी बोलवत असतेच. जर काही तथ्य नसेल तर घाबरायचं काय कारण?”

चूक नाही तर घाबरता का? कायदा हाती घेतला तर कारवाई निश्चित : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने (ED) पाठवलेल्या नोटीसबाबत मीच  अनभिज्ञ आहे. चूक नसल्यास राज ठाकरेंना घाबरण्याची गरज काय? आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलंही जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या घोषणेबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना ईडीच्या नोटीसबाबत विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, “ED ही स्वतंत्र आहे त्यामुळे सरकारी हस्तक्षेप होऊ शकत नाही. राज ठाकरेंना ईडीने पाठवण्यात आलेल्या नोटीसबाबत मला माध्यमांकडूनच समजलं. चौकशीसाठी ईडी बोलवत असतेच. जर काही तथ्य नसेल तर घाबरायचं काय कारण?”

ठाणे बंदवर प्रतिक्रिया

मनसेने ईडीच्या नोटीसविरोधात 22 ऑगस्टला ठाणे बंदचं आवाहन केलं आहे. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “जर काही चूक केली नसेल तर लोकांना का त्रास देता? जर कायदा सुव्यवस्था हाती घेतली तर कारवाई केली जाईल”

मनसेकडून ठाणे, मावळ बंदची हाक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने बजावण्यात आलेल्या समन्सवरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ईडीने राज ठाकरे यांना ज्या दिवशी चौकशीला बोलावलं आहे, त्या दिवशी म्हणजेच 22 ऑगस्टला ठाणे बंदचं (Thane) आवाहन केलं आहे. मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी हे बंदचं आवाहन केलं आहे. याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनी मावळ बंदचीही हाक दिली आहे.

काय आहे प्रकरण?

कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.

या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.

आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.

वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.

संबंधित बातम्या 

स्पेशल रिपोर्ट – किणी ते कोहिनूर : 23 वर्षात राज ठाकरेंची कोणकोणती चौकशी?   

चूक नाही तर घाबरता का? कायदा हाती घेतला तर कारवाई निश्चित : मुख्यमंत्री