… म्हणून मुख्यमंत्र्यांची बारामतीतील महाजनादेश यात्रा पुढे ढकलली

| Updated on: Aug 01, 2019 | 4:09 PM

बारामतीत याच दिवशी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव होत असल्याने मुख्यमंत्री 25 ऐवजी 26 ऑगस्ट रोजी बारामतीत सभा (BJP Mahajanadesh Yatra) घेणार आहेत. तर 27 ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते पुढे रवाना होतील.

... म्हणून मुख्यमंत्र्यांची बारामतीतील महाजनादेश यात्रा पुढे ढकलली
Follow us on

बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर महाजनादेश यात्रा सुरु (BJP Mahajanadesh Yatra) केलीय. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 25 ऑगस्ट रोजी ही यात्रा बारामतीत येणार होती. मात्र बारामतीत याच दिवशी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव होत असल्याने मुख्यमंत्री 25 ऐवजी 26 ऑगस्ट रोजी बारामतीत सभा (BJP Mahajanadesh Yatra) घेणार आहेत. तर 27 ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते पुढे रवाना होतील.

मुख्यमंत्र्यांची सभा बारामतीतील दहीहंडी दिवशीच होत असल्याचं समजल्याने आयोजकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला. पुणे-मुंबईतील दहीहंडी उत्सव पार पडल्यानंतर बारामतीत दुसर्‍या दिवशी दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. संपूर्ण शहरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो. यावर्षी मात्र या उत्साहावर सावट येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 25 ऑगस्ट रोजी बारामतीत येणार होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दहीहंडी आयोजकांची बैठक घेऊन दहीहंडीची तारीख बदलण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यामुळे दहीहंडी आयोजकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे पोलीस यंत्रणेने या उत्सवाला परवानगीच देणार नसल्याची भूमिका घेतली होती.

बारामतीतील दहीहंडी उत्सवावर सावट आल्याने आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना वेळापत्रक बदलण्यासाठी साकडं घालण्याचा निर्णय घेतला. अनेक आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना फॅक्स, ईमेल करुन आपल्या भावना कळवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी याबाबतची वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानुसार या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचं गावडे यांनी सांगितलं. बारामतीत होणार्‍या दहीहंडी उत्सवावर पाणी फिरु नये यासाठी दौर्‍यात बदल करण्यात आल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

महाजनादेश यात्रेचं नवं वेळापत्रक

नव्या वेळापत्रकानुसार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता इंदापूर येथे येणार आहे. त्यानंतर लोणी देवकर, भिगवणमार्गे बारामती तालुक्यात ही यात्रा दाखल होईल. तालुक्यातील पारवडी आणि त्यानंतर सायंकाळी 7 वाजता बारामती शहरात मुख्यमंत्र्यांची सभा होईल, असंही यावेळी बाळासाहेब गावडे यांनी सांगितलं. या सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत मुक्कामी राहणार आहेत. 27 ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते पुढील प्रवासासाठी रवाना होतील.