CM Eknath Shinde | ‘पुढच्या आठवड्यात कशाला, लवकरच…’ मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदेंचं सूचक वक्तव्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालही दिल्लीत हजर!

| Updated on: Aug 06, 2022 | 1:35 PM

महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत राज्यातील सर्व खात्यांचा कारभार, त्या त्या विभागातील सचिवांकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी यासंबंधातील निर्णय दिला.

CM Eknath Shinde | पुढच्या आठवड्यात कशाला, लवकरच... मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदेंचं सूचक वक्तव्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालही दिल्लीत हजर!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत पोहोचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. काही शासकीय कामांसाठी या दोघांचा दिल्ली दौरा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज आणि उद्या हे दोन्ही नेते दिल्लीत असतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम चर्चा होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यानंतर सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करण्यात येईल, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे दिल्लीत आज आणि उद्या होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

मुख्यमंत्री शिंदेंची सहावी दिल्ली वारी

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची सहावी दिल्ली वारी आहे. मात्र या दौऱ्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नावांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण शिंदे-भाजप सरकार अस्तित्वा होऊन एक महिना उलटून गेलाय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. असंख्या कामे, विकासकामं प्रलंबित आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार न होणं, अयोग्य असल्याची टीका विरोधकांकडून होतेय. शिंदे सरकारची खिल्लीही उडवली जातेय. मंत्रिमंडळ विस्ताराअभावी पावसाळी अधिवेशनही लांबलंय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन होणं आवश्यक आहे. येत्या काही दिवसातच नव्या मंत्र्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

आज, उद्या शासकीय बैठका

शनिवार आणि रविवारी नवी दिल्लीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल दाखल होत आहेत. आज दुपारी साडे चार वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक राष्ट्रपती भवनात होणार आहे. तसेच उद्या नीती आयोगाचीदेखील बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीसांसह महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे या बैठकीला हजर राहतील. या दोन दिवसांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

तात्पुरते खात्यांचे अधिकार सचिवांकडे…

दरम्यान, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत राज्यातील सर्व खात्यांचा कारभार, त्या त्या विभागातील सचिवांकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी यासंबंधातील निर्णय दिला. राज्यात महिनाभरापासून कॅबिनेट मंत्री नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणची कामं प्रलंबित आहेत. त्या त्या विभागातील कामांवर निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले आहेत. मात्र मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.